पथकाला शिवीगाळ करणाऱ्या शेराभाईचे अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:16 AM2021-01-20T04:16:47+5:302021-01-20T04:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अजिंठा चौक परिसरात अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना शेराभाई नामक व्यक्तीने शिवीगाळ करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अजिंठा चौक परिसरात अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना शेराभाई नामक व्यक्तीने शिवीगाळ करून अतिक्रमण कारवाईस विरोध केला. त्यामुळे कारवाई थांबली होती. मात्र, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे घटनास्थळी दाखल होताच सुरुवातीलाच शेराभाई यांचेच अतिक्रमण काढत अतिक्रमणाच्या मोहिमेस सुरुवात केली. दिवसभरात अतिक्रमण निर्मूलन विभागाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गालगतच्या १५० टपऱ्या मनपाने तोडल्या. तसेच अनेक पक्क्या अतिक्रमणावरदेखील मनपाच्या पथकाने कारवाई केली.
शहरातून गेलेल्या महामार्गालगत अनेक विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने नेहमी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याचा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी महामार्गालगतची पाहणी केल्यानंतर सोमवारपासून अजिंठा चौकापासून मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईस सुरुवात करण्यात आली. कारवाईदरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना स्थानिक दुकानदारांसह अतिक्रमणधारकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, सर्व विरोध झुगारून मनपाच्या पथकाने १५० विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी महामार्गालगत केलेले पक्के बांधकाम मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाच्या जेसीबीव्दारे तोडण्यात आले.
राजकीय दबाव अन् कारवाई जोमात
कारवाई थांबविण्यासाठी अनेक विक्रेत्यांनी काही नगरसेवक व राजकीय पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांचे सर्व फोन बंद करून मनपा उपायुक्तांनी कारवाईची मोहीम सुरूच ठेवली. राजकीय दबाव झुगारत मनपाकडून सोमवारी जोरदार कारवाई करण्यात आली. जितका जास्त वाद तितकी तीव्र कारवाई अशीच भूमिका मनपाच्या पथकाने केल्याने नंतर वाद करणाऱ्यांनी आवरते घेत, मनपाच्या पथकाला सहकार्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तीन दिवसात महामार्ग अतिक्रमणमुक्त करू
अजिंठा चौकापासून इच्छादेवी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक गॅरेज दुकाने आहेत. या गॅरेजच्या दुकानांवरही मनपाकडून कारवाई करण्यात आली. यासह किरकोळ विक्रेते व भंगार व्यवसाय करणाऱ्यांनीही शेड व पत्री दुकाने तयार करून या ठिकाणी अतिक्रमण केले होते. या विक्रेत्यांवर कारवाई करून, माल जप्त करण्यात आला. तर अनेक टपऱ्यादेखील जेसीबीच्या साहाय्याने उचलून नेण्यात आल्या. तीन दिवसात महामार्गालगतचे सर्व अतिक्रमण काढण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत, कारवाई तासभर थांबली
शेराभाई नामक व्यक्तीने मनपाच्या कारवाईला विरोध करीत कारवाईस अडथळा निर्माण केला. त्यामुळे काही काळ कारवाई थांबली. तसेच शेराभाईंसह काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळदेखील केली. त्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे कारवाईच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विक्रेत्यांनी विरोध सुरूच ठेवला. मात्र, हा विरोध झुगारून उपायुक्तांनी थेट कारवाईचे आदेश दिले. कारवाई सुरू होताच काही काळ गोंधळदेखील झाला. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारकांनी आवरते घेत कारवाईस सहकार्य केल्याचे दिसून आले.