बेवारस मृतदेहांचा शेवटही होतोय कचऱ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:08+5:302021-04-02T04:16:08+5:30
सुनील पाटील जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन ...
सुनील पाटील
जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन भूक व तहान भागविली. विविध सरकारी व निमसरकारी रुग्णालयांमध्ये गरिबांना आयुर्वेदिक काढा तसेच इतर वैद्यकीय सेवा पुरविल्या. एकीकडे हे आशादायी चित्र असताना दुसरीकडे मात्र अपघात किंवा वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या बेवारसांचा शेवट हा कचऱ्यातच होत आहे, याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना सामाजिक संघटना. शहरातील कचरा ज्या ठिकाणी फेकला जातो त्याच जागेवर या बेवारसांचा दफनविधी केला जात आहे. मुबारक चांद शेख(३४,रा. लक्ष्मीनगर) हा तरुण वयाच्या दहाव्या वर्षापासून बेवारस मृतदेहांचा दफनविधी करीत आहे.
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात सध्या नेरी नाका, मेहरुण व पिंप्राळा या भागात स्मशानभूमी उभारण्यात आलेल्या आहेत. नेरी नाका स्मशानभूमी महापालिकेच्या नियंत्रणात आहेत. सध्या कोरोनामुळे या स्मशानभूमी मृतदेह अक्षरशः वेटिंगवर आहेत. इतर मृतदेहांना तर येथे एन्ट्रीच नाही. नातेवाईकांना यायला उशीर होत असेल किंवा अंत्यसंस्काराला विलंब होणारा असेल हे मृतदेह ठेवण्यासाठी वातानुकूलित शवदाहिनी आहे तर आता कोरोनात अग्निदाहिनीचीही निर्मिती झाली आहे.
विविध संघटना तसेच शासकीय रुग्णालयातील या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ज्यांना वारस आहे, त्या मृतदेहांवर विधीवत तथा परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार होतात, मात्र ज्यांना वारस नाही अशा मृतदेहांसाठी तर स्मशानभूमीच नाही. नेरी नाका स्मशानभूमीच्या बाजूला नाल्याला लागून सडक्या कचऱ्याच्या जागी या मृतदेहांचा दफनविधी केला जात आहे. यासाठी पुढाकार घ्यायला कुणीच तयार नाही हे दुर्दैव आहे. महिन्याला तीन ते चार तर वर्षाला ४८ ते ६० बेवारस मृतदेहांचा दफनविधी या ठिकाणी केला जातो.
पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची वेळ
बेवारस म्हणून पुरलेला मृतदेह नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर बाहेर काढावे लागले आहे. शासकीय नियमानुसार तीन दिवस मृतदेह सांभाळावा लागतो. नातेवाईक किंवा वारस नाही आले तर त्या मृतदेहाचा दफनविधी केला जातो. हा मृतदेह जाळला जात नाही. नातेवाईक मिळाल्यानंतर काही मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत तर काही मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेऊन विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहे. काही प्रकरणांमध्ये डीएनए नमुने घेण्यासाठी मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत अशी माहिती मुबारक शेख यांनी दिली.
बेवारस मृतदेह हीच रोजीरोटी (फोटो मुबारक)
बेवारस मृतदेहांवर दफनविधी करणारा मुबारक शेख यांचीही दुर्दैवी कहाणी आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच आईवडिलांचे निधन झाले. तेव्हापासून दफन विधीचे कार्य हाती घेतले. मिळालेल्या दोन पैशातून प्रपंच चालवला जातो. पत्नीच्या आईवडिलांचे निधन झालेले आहे. दोन मुले व पत्नी असे लक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात राहतो, जे काम कोणी करू शकत नाही ते करीत असतानाही आज आपण स्वतःच बेवारस आहोत अशी भावना निर्माण होते. महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाने साधे घरकुल मिळवून दिले नसल्याची खंत मुबारक शेख यांनी व्यक्त केली.