अभियांत्रिकी महाविद्यालये अद्यापही बंदच, अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:15 AM2021-01-21T04:15:34+5:302021-01-21T04:15:34+5:30
जळगाव : इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ८ डिसेंबरपासून सुरू झाले. बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आले. पर्यटनस्थळे व मनोरंजनाची ठिकाणे ...
जळगाव : इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग ८ डिसेंबरपासून सुरू झाले. बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आले. पर्यटनस्थळे व मनोरंजनाची ठिकाणे सुरळीत झाले. मात्र, अद्यापही राज्य शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अर्थकारण बिघडले आहे.
कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे मार्च महिन्यापासून शाळा व महाविद्यालये बंद पडली. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ऑनलाइन पद्धतीने अध्यापनाला सुरुवात झाली. कोरोनाचा कहर कमी होताच ८ डिसेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्गसुद्धा सुरू झाले. लवकरच इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. दुसरीकडे अभियांत्रिकी महाविद्यालये अजूनही बंदच आहेत. काही महाविद्यालयांतील प्राध्यापक वेतनाविना, तर कुठे काही अंशी कपात करून वेतन दिले असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व काही सुरळीत झाल्याने आता महाविद्यालयेही सुरू करावीत, अशी आग्रही मागणी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतून होऊ लागली आहे. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी; एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांनाही महाविद्यालये सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.
कर्मचाऱ्यांनी जगावे कसे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये बंद आहेत. जिल्ह्यात १ शासकीय तर ८ खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यातील काही महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांना ७० ते ८० टक्केच वेतन मिळत आहे.
महाविद्यालयांची संख्या
शासकीय
०१
खासगी
०८
विद्यार्थी क्षमता
५०००
प्राध्यापकांची संख्या
६००
शिक्षकेतर कर्मचारी संख्या
५००