जळगावात इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची ‘घरवापसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:19 PM2018-06-24T13:19:35+5:302018-06-24T13:21:13+5:30
शहरी व ग्रामीण भागात फटका
विलास बारी
जळगाव : आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे या हौसेपोटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांची मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ‘घरवापसी’ झाली आहे. विद्यार्थ्यांना न झेपणारा अभ्यास, इंग्रजी शाळांची न परवडणारी फी, विद्यार्थी वाहतुकीचा खर्च व पालकांची घरीअभ्यास न घेण्याची क्षमता यामुळे जळगाव शहरात यावर्षी हे प्रमाण वाढले आहे.
काही वर्षांपूर्वी शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील मुलांच्या पालकांचादेखील या शाळांकडे कल वाढला होता.
आर्थिक गणित विस्कळीत झाल्याने वाढले प्रमाण
आपला पाल्य देखील परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावा आणि त्याने इंग्रजी बोलावे ही शहरासह ग्रामीण भागातील पालकांची अपेक्षा असते. त्या हौसेपोटी ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देखील घेतात.
मात्र अवास्तव फी, शाळा ते घर या दरम्यान विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च तसेच शाळेतील विविध उपक्रमांसाठी येणारा खर्च यामुळे पालकांचे आर्थिक गणित विस्कळीत होत आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पालक नापास
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देण्यात येतो. हा गृहपाठ काही पालकांच्या अवाक्याबाहेर असल्याने ते विद्यार्थ्याचा अभ्यास घेऊ शकत नाहीत. शाळेत जितके शिकविले जाते तितक्यावर विद्यार्थी अवलंबून राहत असल्याने पुढे हा अभ्यास त्याच्याकडून झेपला जात नाही. पुढे त्याच्या गुणवत्तेबाबत पालकांकडून शाळेवर खापर फोडण्यात येते. त्यामुळे शाळेने गृहपाठ दिल्यानंतर विद्यार्थ्याऐवजी पालकांची जास्त परीक्षा असते.
विद्यार्थी गळतीचे प्रमाण पाचवीच्या वर्गात अधिक
हौसे खातर पालक विद्यार्थ्याला नर्सरी ते चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देत असतो. नंतर मात्र पैसे खर्च करून देखील विद्यार्थ्याची प्रगती दिसत नसल्याने तो जवळच असलेल्या सेमी किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत असतो.
इयत्ता पहिली ते चौथी दरम्यान विद्यार्थ्यांची गळती सुरु होते. तर पाचवीच्या वर्गात गेल्यानंतर याचा सर्वाधिक फटका असतो.
नाव सेमीचे मात्र अभ्यासक्रम मराठीत
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढल्यानंतर पालक जवळच असलेल्या सेमी इंग्रजीच्या वर्गात प्रवेश घेतो. मात्र इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत गणित व इंग्रजी वगळता सर्व विषय हे मराठीतच असतात. त्यामुळे सेमीचे नाव असले तरी माध्यम मराठीच असते. त्यातच मोफत गणवेश व पुस्तके मिळत असल्याने पालक देखील या शाळांकडे आकर्षित होतो.
शाळा बदलाच्या शर्यतीत मुलांच्या मनस्थितीकडे दुर्लक्ष
मुलगा किंवा मुलगी पहिलीमध्ये गेल्याबरोबर त्याने इंग्रजीत बोलायला पाहिजे ही अवास्तव अपेक्षा पालकांची असते. यासाºयात त्याची आकलन क्षमता किंवा त्याच्या मनस्थितीचा विचार होत नाही. त्यातूनच मग सुरुवातीला इंग्रजी नंतर सेमी इंग्रजी आणि सर्वात शेवटी मराठी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्याचा प्रवेश घेतला जातो.
वारंवार शाळा बदलविण्यात येत असल्याने विद्यार्थी देखील गोंधळात पडतो. मात्र पालकांकडून विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार केला जात नसल्याने पुढे हा विद्यार्थी आत्मविश्वास हरवून बसतो.
जळगावातील ५०० वर विद्यार्थी सेमीमध्ये...
या सर्व कारणांमुळे जळगाव शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील सुमारे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावर्षी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. शहरासोबत ग्रामीण भागात देखील हे प्रमाण जास्त आहे.
अनेक पालक हौसेपोटी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात. मात्र प्रवेशानंतर शाळेची फी, शिकवणी वर्ग व वाहतूक खर्च हा वाढतच जातो. सर्वच विषय इंग्रजीत असल्याने अभ्यास घेण्याची काही पालकांची क्षमता नसते. जेव्हा मुलांमध्ये प्रगती दिसत नाही तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला जातो.
-चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ, जळगाव.
आपली आर्थिक परिस्थिती पाहून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा. मुलांच्या गुणवत्ता वाढीची जबाबदारी शाळेची आहेच त्याचबरोबर पालकांचीदेखील आहे. घरी नियमित गृहपाठ घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून येते.
-मुरलीधर कोळी, पालक, नेहरू नगर, जळगाव.