इंग्रजीची प्रश्नपत्रिका १० रुपयात !

By admin | Published: March 12, 2017 12:37 AM2017-03-12T00:37:16+5:302017-03-12T00:37:16+5:30

५ केंद्रांवर कॉप्यांचा पाऊस : अर्ध्या तासात दहावीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर

English papers in 10 rupees! | इंग्रजीची प्रश्नपत्रिका १० रुपयात !

इंग्रजीची प्रश्नपत्रिका १० रुपयात !

Next

जळगाव : दहावीचा इंग्रजीचा पेपर शनिवारी झाला. पेपर सकाळी ११ वाजता सुरु होताच अवघ्या अर्ध्यार् तासात प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर आली. त्यानंतर तिच्या झेरॉक्स काढून १० रुपयात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात सुरु होता. प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानंतर उत्तरे तयार करुन विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात येत होती. याकडे पोलीस, शिक्षण विभाग व शाळांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
कॉपी बहाद्दरांचा वर्गात प्रवेश
शनिवारी  इंग्रजीचा पेपर असल्याने प्रशासनाकडून काही संवेदनशील केंद्रावर पेपर सुरु होण्याआधी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच या बंदोबस्ताची ‘ऐसी की तैसी’ केली. कॉपी बहाद्दरांनी वर्गात जावून प्रश्न पत्रिका बाहेर आणली व तिच्या झेरॉक्स करुन परीक्षा केंद्राबाहेर अक्षरश: बाजार मांडला होता.   काही केंद्रांवर वर्गांमध्ये शिक्षकांच्या परवानगीने सर्रासपणे कॉपी सुरु होती.
प्रतापनगरात फोडली प्रश्न पत्रिका
संवेदनशील केंद्र असलेल्या प्रतापनगरातील एका केंद्रावर अर्ध्या तासातच वर्गातून प्रश्न पत्रिका बाहेर आली. त्यानंतर प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स काढून गाईडच्या मदतीने संबधित प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थीपर्यंत पुरविली जात होती.
दरम्यान, ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रश्नपत्रिकेचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी परीक्षा केंद्रापासून पळ काढला. परीक्षा केंद्राच्या मागील बाजुच्या गेटव्दारे परीक्षार्थींना सर्रासपणे कॉप्या पुरविल्या जात होत्या.
स्टेट बँकेनजीक असलेल्या एका शाळेबाहेर काही व्यक्तींकडून प्रश्नपत्रिकेतील काही प्र्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असल्याचा दावा करत दहा रुपयांमध्ये एक प्रिंट अशी विक्री केली जात होती. अशीच स्थिती विद्यानिकेतनच्या केंद्रावर देखील पहायला मिळाली. जिल्हा ग्र्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाच्या भिंतीवर चढून वर्गांमध्ये कॉप्या पुरविल्या जात होत्या.
स्मार्टफोनचा सर्रास वापर
परीक्षेदरम्यान स्मार्ट फोनचा वापर करण्यास मनाई असली तरी परीक्षा केंद्रामध्ये अनेक शिक्षकांनी स्मार्ट  फोन सर्रासपणे वापरले. तर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात झेरॉक्सला बंदी असल्यावर सुध्दा नूतन मराठा महाविद्यालय, ए.टी.झांबरे विद्यालय, अ‍ॅग्लो उर्दू, का.ऊ. कोल्हे या विद्यालयाच्या परिसरात झेरॉक्सचे दुकाने सुरु होती.

कॉपी पुरविण्यावरुन हाणामारी
विद्यानिकेतन केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविण्याच्या कारणावरून युवकांमध्ये हाणामारी झाली. जळगाव शहरासह तालुक्यातील कानळदा केंद्रावर देखील सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.
१९ विद्यार्थ्यांवर कारवाई
 इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या जिल्ह्यातील विविध केंद्रावर १९ विद्यार्थ्यांवर करण्यात आली. यावल येथील साने गुरुजी विद्यालयात ३ , किनगाव हायस्कूल येथे २, भुसावळ  शहरात १, भुसावळ तालुक्यातील किन्ही विद्यालयात २ विद्यार्थ्यांवर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी  तर भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील केंद्रावर ७ तर गिरड  केंद्रावर ३ विद्यार्थ्यांवर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी कारवाई केली. तर बामणोद परीक्षा केंद्रावर १ विद्यार्थ्यांवर राज्य परीक्षा मंडळाच्या सदस्या शुभांगी राठी यांनी कारवाई केली आहे.
हुशार विद्यार्थ्यांना त्रास
 कॉपीमुक्त अभियानाचा शहरात फज्जा उडाला आहे. अनेक केंद्रांवर तुकड्या कमी होण्याच्या भितीने सर्रास कॉपी सुरु आहे. त्याचा नाहक त्रास हुशार विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.

Web Title: English papers in 10 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.