चारठाणा येथे निसर्ग सानिध्यात पर्यटनाचा मनमुराद आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:46+5:302021-09-27T04:18:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४० क्षेत्र वनजमीन आहे. अशात वन्यजीव आणि वन्यसंपत्तीने नटलेल्या वढोदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४० क्षेत्र वनजमीन आहे. अशात वन्यजीव आणि वन्यसंपत्तीने नटलेल्या वढोदा वनपरिक्षेत्रात चारठाणा भवानी माता मंदिर व वनसमिती उद्यान निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद देणारे पर्यटन स्थळ होय. पावसाळ्यातील गडद हिरवाई विस्तीर्ण तलाव व पैलतीरावर वन्य प्राण्यांचे दर्शन एखाद्या अभय अरण्यात पर्यटनासाठी आल्याचा आनंद येथे मिळतो.
मुक्ताईनगर-कुऱ्हा रोडवर मुक्ताईनगरपासून १८ कि.मी. अंतरावर वढोदा वनपरिक्षेत्राचे घनदाट जंगल आणि सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत हिरवाईने नटलेले चारठाणा हे छोटेसे गाव ग्रामदैवत म्हणून भवानी मातेचे येथे पुरातन असे मंदिर आहे. गेल्या १० वर्षांपूर्वी वनअधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी येथे कुऱ्हाडबंदी कटाक्षाने राबविली. यासाठी वनव्यवस्थापन समितीने जागता पहारा ठेवला. जंगलाचे संगोपन केले. यातून येथे पर्यटन क्षेत्र विकास करण्याचा दृष्टिकोन मिळाला आणि वनविभाग व येथील वनव्यवस्थापन समितीने येथे वन पर्यटन केंद्र विकसित केले. अगदी राज्य शासनाचा संत तुकाराम महाराज वनश्री पुरस्काराने वनव्यवस्थापन समितीचा गौरव झाला.
-दृश्य स्थळ
या ठिकाणी प्रशस्त तलाव, तलावाच्या काठावर पुरातन तपोवन भवानी माता मंदिर आहे. मंदिराजवळील तलावाखाली न जाता वरूनच पाहण्यासाठी दृश्य स्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यावर भरगच्च हिरवळीचे गवत (लॉन) लावले आहे. त्यावरूनच आपण खालील तलाव पाहू शकतो. लगतच लहान मुलांना मुक्तपणे बागळण्यासाठी बालोद्यानाची निर्मिती केली आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची झाडे, इतर सजावटींची झाडे झुडपे लावलेली आहेत. मुलांना आकर्षित करण्यासाठी उद्यानात हरीण, मोर, काळवीट यांच्या प्रतिकृती आहेत. मुलांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी सी- सॉसारखे खेळणे आहेत. रोपवाटिका, वन चेतना दालन यात या भागात संचार असलेले वन्यप्राणी, वनसंपत्ती बाबतचे सचित्र माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अलीकडे तलावात पाणी कमी असल्याने तूर्त बोटिंग बंद आहे.
मंदिराविषयी
याठिकाणी प्राचिन कुलस्वामिनी भवानी मातेचे मंदिर असून, धार्मिकदृष्ट्यासुद्धा चारठाण्याला विशेष महत्त्व आहे. या मंदिराला ‘तपोवन भवानी माता मंदिर’ असे म्हणतात. शिवाजी महाराज बऱ्हाणपूर आणि सुरत येथे जाताना या मंदिरात भवानी माता आणि शिव (शंकर) यांची पूजा करत असत, अशी नोंद इतिहासात आढळते. यावरून हे मंदिर अति प्राचिन असल्याचा अंदाज येतो.
हे मंदिर अतिशय पुरातन आणि हेमाडपंथीय मंदिर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय नयनरम्य आणि प्रशस्त आहे.
सुविधा-
प्रशस्त अशा तलावावर नौकाविहाराची सोय तलावाच्या पैलतीरावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांचे दर्शन घडविणारे तीन उंच असे मनोरे या मनोऱ्यावरून लांब अंतरावरच्या वन्यप्राण्यांसह पक्षी निरीक्षण व निसर्गसौंदर्य पाठोपाठ सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठीचे अप्रतिम लोकेशन आहे.
मुक्कामासाठी येथे व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत दुमजली विश्रामगृह आहे. यात तीन सुसज्ज दालन आहेत. पर्यटकांसाठी हे भाडे तत्त्वावर उपलब्ध आहे. त्यामुळे जंगलात रात्री मुक्कामाचा आनंद येथे घेता येतो.
हे प्राणी दिसतात-
या वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या जंगलात पट्टेदार वाघ, बिबट्याचे अस्तित्व आहे. म्हणून राज्य शासनाने हा परिसर टायगर रिसर्विअर घोषित केला आहे. तसेच या भागात वन्य पेरण्यांमध्ये हरीण, नीलगाय, रोही, सांबर, अस्वल, यापैकी किमान एखादे तरी वन्यप्राणी पाहणी मनोऱ्यावरून तलावाच्या पैलतीरावर पाणी पिताना किंवा जंगलात फिरताना दिसून येतात.