आनंद तरंग - आठाई एक अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:10 PM2018-09-14T13:10:26+5:302018-09-14T13:10:45+5:30
आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे म्हणतात. आतापर्यंत १९९९, २००८, २०११ व २०१८ मध्ये आठाई केली. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा आहे. तत्पूर्वी १९९२ साली मला माझ्या पूज्य सत्यनारायण गोयंका यांच्याकडून अंतर्मुख होण्याची कला, विपश्यना साधना प्राप्त झाली. १९९९ साली पहिली आठाई अनुभवली. ६ किलो वजन कमी झाले. केवळ दोनच दिवस कसे तरी काम करून पुढील ६ दिवस घरी आराम करूनच व्रताची सांगता झाली. २००८ मध्ये व्रतात माझी काम करण्याची क्षमता वाढली. यावेळी ४ दिवस काम करू शकलो. २०११ साली गांधी रिसर्च फाउंडेशन म्युझियमच्या निर्मितीचे काम करीत असताना तिसरी आठाई केली. माझे गुरुजैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यामते आपल्या कामात मन लावून व्यग्र असणे हाच अध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग असल्यामुळे ते काम करणाऱ्या माणसाला इतके कठीण व्रत करण्यास कधीच उत्तेजना देत नसते. त्यामुळे त्यांना कळू न देताच मी आठ दिवसांची पचकावणी केली. माझी आठाई सुरु आहे, हे भवरलाल जैन यांना कळल्यावर पुढचे दोन दिवस घरीच रहावे लागले. यावेळी शरीरातील वेदनांकडे सातत्याने बघू शकलो हीच मी या व्रताची उपलब्धी मानतो. मन बºयापैकी शांत होते, काम करताना मन विचलित होत नव्हते. व्रत करूनही काम करण्याची क्षमता वाढल्याने एक वेगळा आत्मविश्वास आला. वय वाढत होते आणि त्याच्यासोबत येणाºया व्याधीही टाळता येणाºया नव्हत्या. २०१४ मध्ये हृदयाची समस्या होती. औषधोपचार सुरु होते. असे असतानाही सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नेहमी प्रमाणे काम करून हे व्रत पूर्ण केले. तेही एकही औषधाची गोळी न घेता. रक्तदाबही वाढला नाही. ही एक वेगळीच अनुभूती होती.
- शिरीष बर्वे