बाजारपेठ सुरू होणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:43+5:302021-06-01T04:13:43+5:30
जळगाव : दोन महिन्यानंतर बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ...
जळगाव : दोन महिन्यानंतर बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने व्यापारीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतलेल्या या निर्णयाचे व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद असल्याने व्यापारनगरी असलेल्या जळगावातील करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यामध्ये व्यापारीवर्गासह त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचारी, कामगारांचे मोठे हाल होत होते. इतकेच नव्हे तर अर्थचक्र थांबल्याने सर्वच घडी विस्कटली होती. मात्र आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील व्यापार पुन्हा सुरू होणार असल्याच्या आदेशामुळे व्यापारीवर्ग उत्साहित झाला आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कॅट, फाम, जिल्हा व्यापारी महामंडळ यासह इतरही व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नियमांचे पालन महत्त्वाचे
पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना आपली दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र व्यापार करीत असताना शासन, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी व ग्राहकांनी देखील पालन करावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बारिया, उपाध्यक्ष युसूफ मकरा, अनिल कांकरिया, कॅट संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी केले आहे.