जळगावात सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:05 PM2018-11-11T12:05:37+5:302018-11-11T12:06:18+5:30

मुहूर्त साधण्यासाठी सुवर्णनगरीत गर्दी

The enthusiasm for buying gold in Jalgaon | जळगावात सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साह

जळगावात सोने खरेदीसाठी प्रचंड उत्साह

Next
ठळक मुद्देसलग सुट्यांमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दीसराफ बाजाराला सुवर्ण झळाली

जळगाव : दिवाळीतील सर्व सहा दिवसांच्या मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी होऊन दिवाळी खरेदी १८० कोटींवर पोहचली. सोने खरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून दररोज रात्री १० वाजेपर्यंत सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी असल्याचे चित्र आहे. बाजारात यंदा केवळ सोन्यामध्येच ६० कोटींची उलाढाल होऊन दुचाकी, कार, फ्रीज, वाशिंग मशिन यांनाही मोठी मागणी राहिली.
सराफ बाजाराला सुवर्ण झळाली
सोेने खरेदीला सुवर्णनगरी जळगावात विजयादशमीपासून झळाली मिळाली. दिवाळीमध्ये प्रत्येक मुहूर्त यंदा स्वतंत्र दिवशी आल्याने प्रत्येक दिवशी सोने खरेदीसाठी गर्दी होती. सोन्यात ५० टक्के ग्राहकी मणी-मंगळसूत्र, अंगठी, पाटल्या, कर्णफुले इत्यादीमध्ये होती. १५० फर्ममध्ये ६० कोटींची झाली. लक्ष्मीपूजनापर्यंत मोठी खरेदी झाल्यानंतर पाडवा व भाऊबीजेलाही सराफ दुकानांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. या दोन दिवसात १० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
पाडव्याचा मुहूर्त साधला
साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या दीपावली पाडव्याला देखील सोने खरेदीस अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवसापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला झाल्याचे सांगण्यात आले.
अजून आठवडाभर गर्दी कायम राहणार
सुवर्ण बाजारात अजून आठ दिवस गर्दी कायम राहणार आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील माहेरवासीणी येथे आल्यानंतर वर्षभरातील केलेल्या बचतीतून जळगावातील सोने खरेदी करतात. जळगावच्या लेकी राज्यात अथवा इतरत्र कोठेही असल्या तरी भाऊबीजेसाठी माहेरी आल्यानंतर त्या जळगावातूनच सोने खरेदी करून नेतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.
पॅनकार्डची सक्ती हटविल्याने वाढली उलाढाल
सोने खरेदीमध्ये दोन लाखाच्यावर खरेदी केल्यास पॅनकार्ड सक्तीचे होते. मात्र ही अट मागे घेतल्यानेही सुवर्ण खरेदीला वेग आल्याचे सांगितले जात आहे.
चारचाकी, दुचाकींचे दालने फुल्ल
दिवाळी पाडवा तसेच भाऊबीजेला चारचाकी व दुचाकीच्या दालनात गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तापर्यंत १३०० दुचाकींची विक्री झाल्यानंतर त्यात दोन दिवसाच आणखी भर पडून ही संख्या १६००वर पोहचली. चारचाकीच्या दालनातही असेच चित्र होते. या दोन दिवसात ३० चारचाकींची भर पडून यंदा ४३० नवीन चारचाकी रस्त्यावर आल्या.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनातही पाडव्याला तसेच भाऊबीजेला गर्दी दिसून आली. फ्रिज, वाशिंग मशिन, एलईडी यांना मोठ्या प्रमाणात मागणी राहिली. मोबाईल खरेदीसाठीदेखील विविध दुकानांवर गर्दी होती. यामध्ये ४०० मोबाईल विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
कपडे, फटाके खरेदीचीही लगबग
बाजारपेठेत दिवाळीसाठी कपडे खरेदी झाल्यानंतर भाऊबीजेलादेखील देवाण-घेवाण करणयासाठी कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. यामध्ये रेडीमेड कपड्यांना अधिक मागणी होती. फुले मार्केटमध्ये तर पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र दिसून आले.
वाहनांच्या रांगा
बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे वाहने लावण्यास जागाही कमी पडत होती. संध्याकाळी तर विविध चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारीदेखील असेच चित्र शहरात होते. सलग सुट्या आल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत दररोज गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
यंदा फराळाच्या साहित्यालाही मोठी मागणी राहिली. वाजवी, रास्त दरात फरसाण व मिठाई विक्रीचे अनेक स्टॉल शहरात लावण्यात आले होते. एकूण मिठाईत २ कोटीपर्यंत उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. त्यात निम्मे ग्राहकी माव्याच्या पदार्थांची व अर्ध्यामध्ये फरसाण २५ टक्के, मैदा व बेसनपीठाचे पदार्थ २५ टक्के आहे. दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, कामगार वर्ग बाजारपेठेतील उलाढालीचा केंद्र ठरला.
खरेदीचा अंतिम टप्पा
गणेशोत्सवापासून विविध कंपन्यांच्या सवलतीच्या योजना सुरू होतात. या योजनांचा अंतिम टप्पा म्हणजे दिवाळी. सणांच्या काळात प्रत्येकवेळी यापेक्षा चांगली आॅफर पुढे येईल, या उद्देशाने अनेकवेळा खरेदी पुढे ढकलली जाते. परंतु दिवाळी हा वर्षातील शेवटचा सण असल्यामुळे सर्व कंपन्यांच्या घसघशीत सूट देणाऱ्या आॅफर्स असल्याने अनेकजण दिवाळीला सर्वच वस्तूंची खरेदी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सजावटीची खरेदी, पूजेचे साहित्य, कॉस्मेटीक, पादत्राणे व इतर वस्तूंमध्ये मोठी उलाढाल झाली.
यंदा सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. विशेषत: सर्व मुहूर्त स्वतंत्र दिवशी आल्याने दिवाळीच्या दिवसामध्ये दररोज खरेदीसाठी गर्दी होती. दररोज रात्रीपर्यंत गर्दी होत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

यंदा दिवाळीच्या काळात चारचाकी खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाला. ग्राहकांनी धनत्रयोदशीला तसेच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला अधिक महत्त्व दिले. दिवाळी पाडव्याला काही वाहनांची विक्री झाली.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.

Web Title: The enthusiasm for buying gold in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.