जळगावात मतदारांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 03:41 PM2017-02-03T15:41:23+5:302017-02-03T15:41:23+5:30

शिक पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर मतदान झाले.

The enthusiasm of Jalgaon voters | जळगावात मतदारांचा उत्साह

जळगावात मतदारांचा उत्साह

Next
पदवीधर मतदार संघ : रावेर, चोपडा व धरणगावात दुपारपर्यंत ३० टक्के मतदान
 
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ३ - नाशिक पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रावेर,चोपडा व धरणगाव या तालुक्यांमध्ये २२ ते २७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. जळगावातील आर.आर.विद्यालयात दुपारी २ नंतर महिला व पुरुष मतदारांची मोठी गर्दी झाली.
 
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघसाठी जळगाव शहरात आर.आर.विद्यालय व भा.का.लाठी विद्यालय ही दोन मतदान केंद्र होती. तर उर्वरित जिल्ह्यात ३९ मतदान केंद्र होती. जिल्ह्यात एकूण ३४ हजार ४४२ मतदार आहेत. त्यात २५ हजार ७२५ पुरुष तर ८ हजार ७१७ स्त्री मतदार आहेत.
 
दुपारी १२ पर्यंत २१ टक्के मतदान
 
आर.आर.विद्यालय व भा.का.लाठी विद्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जळगाव तालुक्यातील मंडळनिहाय मतदान कक्ष तयार करण्यात आले होते. सकाळी १० वाजेपर्यंत तुरळक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यानंतर गर्दी सुरु झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ५ हजार ७६५ पुरुष तर १४३५ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
 
रावेर, चोपडा व धरणगावात प्रतिसाद
 
सर्वाधिक २८ टक्के मतदान हे रावेर तालुक्यात झाले. त्यापाठोपाठ धरणगाव तालुक्यात २७.१८ टक्के तर चोपडा तालुक्यात २४.६४ टक्के मतदान दुपारी २ वाजेपर्यंत झाले. तर पाचोरा व भडगाव या तालुक्यात केवळ १७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. 
 
७१ सेंटीमीटरची मतपत्रिका
 
 निवडणुकीसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ७१ सेंटीमीटर लांबीची मतपत्रिका होती. मतदारांना १ ते ५ असे पसंतीक्रम लिहिण्याची संधी होती. मतपत्रिका बाद होऊ नये यासाठी केंद्राच्या बाहेर माहिती फलकावर मतदानाची पद्धत कशी आहे त्याबाबत माहिती लावली होती.
 
संगणकाद्वारे मतदारांची अपडेट माहिती
 
काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे व भाजपाचे डॉ.प्रशांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांचे यादीतील नाव, मतदान केंद्र शोधून देण्यासाठी आर.आर.विद्यालयाच्या बाहेर टेबल लावलेले होते. काही ठिकाणी यादीनुसार तर काही ठिकाणी संगणक व मोबाईल अ‍ॅपद्वारे मतदारांचा क्रमांक तसेच बूथक्रमांक शोधण्यात येत होता. 
 
मतदान केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी
 
मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. प्रवेशद्वाराजवळच काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे पदाधिकारी मतदारांना  आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. 

 

Web Title: The enthusiasm of Jalgaon voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.