प्रत्येक फेरीनंतर वाढत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:32 PM2019-05-24T12:32:23+5:302019-05-24T12:33:02+5:30
मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील तसेच रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्याच उमेदवार रक्षा खडसे यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य घेण्यास सुरुवात केली व तेव्हापासून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. त्यानंतर प्रत्येक फेरीत हे मताधिक्य वाढतच गेल्याने जल्लोषही वाढत गेला. जळगाव मतदार संघाच्या एकूण २९ फेऱ्यांमध्ये २५व्या फेरीचा अपवाद वगळता उन्मेष पाटील यांचे मताधिक्य वाढतच राहिले. रावेरच्या एकूण २४ फेऱ्यांमध्ये रक्षा खडसे यांचे मताधिक्य कोठेच कमी झाले नाही, हे विशेष.
पहिल्या फेरीनंतर...
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर जळगाव मतदार संघाचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी पहिल्याच फेरीअखेर २९ हजार ९२७ मते मिळविले तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ११ हजार ४११ मते मिळाली. यात पाटील यांनी १८ हजार ५१६ मताधिक्याने आघाडी घेण्याचे खाते उघडले. या सोबतच रावेर मतदार संघाच्या उमेदवार यांनी २५ हजार ३९८ मते मिळविली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना १५ हजार ९८ मते मिळाली व येथे खडसे यांनी १० हजार ३०० मतांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीपासूनच्या या आघाडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत गेला व पहिल्या फेरीचा निकाल स्पष्ट होताच जल्लोषही सुरू झाला.
तिसºया फेरीनंतर...
दोघेही उमेदवारांची ही आघाडी दुसºयाही फेरीत वाढत राहून तिसºया फेरी अखेर उन्मेष पाटील यांनी ५० हजारावरील मताधिक्याचा टप्पा गाठत ५६ हजार ६१७ मतांनी आघाडी घेतली. दुसरीकडे रावेर मतदार संघात खडसे यांनीदेखील चौथ्या फेरीअखेर ५० हजारावरील मताधिक्याचा टप्पा पार करीत ५० हजार ५८१ मतांनी आघाडी घेतली. या फेरीअखेर दोघंही उमेदवारांनी एक लाख मतांचा टप्पा पार केला. यात खडसे यांनी एक लाख ६ हजार ९२९ मते मिळविली तर उन्मेष पाटील यांनी एक लाख २१ हजार ५३ मते मिळविली.
सहाव्या फेरीनंतर...
दोघंही उमेदवारांनी हा झंझावात कायम ठेवत सहाव्या फेरी अखेर उन्मेष पाटील यांनी एक लाखाच्या मताधिक्याचा टप्पा पार करीत १ लाख १३ हजार ७३३ मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरीत त्यांनी दोन लाख मतांचा टप्पा पार करीत २ लाख ११ हजार ५१६ मते मिळविली. रावेर मतदार संघात रक्षा खडसे यांनी आठव्या फेरी अखेर दोन लाख मतांचा टप्पा तर नवव्या फेरी अखेर एक लाख मताधिक्याचा टप्पा पार केला.
बाराव्या फेरीनंतर...
मताधिक्याचा हा आलेख असाच चढत जाऊन बाराव्या फेरीअखेर उन्मेष पाटील यांनी दोन लाखाच्या पुढील मताधिक्याचा टप्पा पार केला तर रक्षा खडसे यांनी १५व्या फेरीअखेर हा टप्पा पार केला.
शेवटच्या फेरीनंतर...
जळगाव मतदार संघाच्या एकूण २९ फेºया झाल्या. शेवटच्या फेरी अखेर उन्मेष पाटील यांनी एकूण ४ लाख ८ हजार ९७३ मतांचे मताधिक्य मिळविले. तत्पूर्वीच त्यांनी २६व्या फेरीलाच चार लाखावरील मताधिक्याचा टप्पा पार केला होता. रावेर मतदार संघाच्या एकूण २४ फेºया झाल्या. यात शेवटच्या फेरीअखेर रक्षा खडसे यांनी ३ लाख ३१ हजार ८५६ मतांनी आघाडी घेतली. त्यांनीही शेवटच्या फेरीपूर्वीच २१व्या फेरीअखेर ३ लाखाच्या मताधिक्याचा टप्पा ओलांडला होता.
उन्मेष पाटील हे सुरुवातीपासून आघाडी घेत असताना २५व्या फेरीअखेर (३, ९९,५०१) त्यांचे मताधिक्य २४व्या फेरीच्या (३, ९९, ५६६) तुलनेत केवळ ६५ मतांनी कमी झाले. मात्र त्यानंतर हे मताधिक्य वाढत जाऊन २६व्या फेरीला त्यांनी चार लाखाच्या मताधिक्यांचा टप्पा ओलांडला.