५६ दिवसांनंतर आज खुली होणार संपूर्ण बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:41+5:302021-06-01T04:13:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधामुळे ६ एप्रिलपासून बंद असलेली जळगावची बाजारपेठ आता १ जूनपासून ...

The entire market will be open today after 56 days | ५६ दिवसांनंतर आज खुली होणार संपूर्ण बाजारपेठ

५६ दिवसांनंतर आज खुली होणार संपूर्ण बाजारपेठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असलेल्या निर्बंधामुळे ६ एप्रिलपासून बंद असलेली जळगावची बाजारपेठ आता १ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन, तर इतर सर्व प्रकारची दुकाने केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशीच सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहेत. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी संध्याकाळी काढले. या आदेशात मात्र सलून, स्पा सेंटर, जिम यांना परवानगी नाकारण्यात आली असून, मॉर्निंग वॉकसाठीदेखील वेळ ठरवून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आदेशानुसार शहरातील महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह सर्वच व्यापारी संकुलदेखील सुरू होणार आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील रुग्णसंख्या हजाराच्या घरात पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले. यात ६ एप्रिलपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. १ जूनपासून नवीन नियमावलीचे राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आल्यानुसार जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांच्या खाली व ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा अधिक उपलब्ध असल्याने जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या इतर दुकानांना परवानगी मिळाली आहे.

संकुलातील व्यापाऱ्यांना दिलासा

गेल्यावर्षी निर्बंध शिथिल करताना शहरातील फुले मार्केटसह इतर सर्वच व्यापारी संकुलांना सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, यावेळी कोरोनाची स्थिती चांगलीच नियंत्रणात आल्याने हे संकुल देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

''स्वतंत्र दुकाने'' उल्लेखाने काहीसा संभ्रम

इतर सर्व प्रकारच्या दुकानांना परवानगी देताना ''स्वतंत्र ठिकाणी असलेल्या'' असा उल्लेख आदेशात आल्याने संध्याकाळी व्यापाऱ्यांसह सर्वांमध्ये व्यापारी संकुले सुरू होतात की नाही याविषयी काहीवेळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, व्यापारी संकुलातील सर्व दुकानेही स्वतंत्र व वेगवेगळ्या मालकांची असल्याने मॉलसारखी ती एकत्रित नसल्याने स्वतंत्र दुकान म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आल्याचे स्पष्टीकरण झाले व व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर झाला.

संचारबंदीसह विशेष निर्बंध १५ जूनपर्यंत

संचारबंदीसह लागू असलेले सुधारित विशेष निर्बंध १५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहेत.

संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध?

भविष्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्के किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता ४० टक्केपेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

रस्त्यावर विक्री केल्यास कारवाई

जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगर पंचायत भागातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची व त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने शहरातील गर्दी होणाऱ्या अशा ठिकाणी विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात यावी. जे विक्रेते निर्देशाचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

नवीन आदेशात दिलेली सूट व बंधने-

अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.

- स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारची सर्व दुकाने ही केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. ही दुकाने दर शनिवार व रविवार या दोनही दिवशी पूर्ण वेळ बंद राहतील.

- सर्व प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी, काउंटरसमोर एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

- दुकान मालक, चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काउंटरप्रमाणे काच, प्लास्टिकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टिक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यास मुभा दिली आहे.

- अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोहोच वितरण सुविधा दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत देता येणार आहे. ई कॉमर्स सुविधेद्वारे अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर प्रकारच्या वस्तूंची सुविधा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत देता येतील.

-सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद.

- अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी २ वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी

- सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) २५ कार्यालयीन उपस्थिती. कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा लागणार आहे.

- मान्सूनपूर्व शेतीविषयक कामे, पेरणी हंगाम सुरू असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवता येतील.

- माल वाहतूक, कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार असून, सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरिता सूट राहणार आहे. सूट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही.

- नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक, चालक व घटक यांच्याकडून १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविडचा संसर्ग कमी होईपावेतो ती दुकाने बंद ठेवण्यात येतील.

- आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार यांचे (४५ वर्षांवरील) लसीकरण करून घेणे बंधनकारक राहणार असून कर्मचारी, कामगार यांची साप्ताहिक आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक राहील.

- मॉर्निंग वॉक, सायकलिंग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरिता केवळ पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेतच सूट.

Web Title: The entire market will be open today after 56 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.