प्रवेश सोहळा मुक्ताईनगरला, पडसाद जामनेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 04:16 PM2020-11-04T16:16:20+5:302020-11-04T16:17:27+5:30
भाजपने या पक्ष प्रवेशाचे " राष्ट्रवादीचे उसने अवसान " या शब्दात वर्णन केले, तर " ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ," अशी कोपरखळी राष्ट्रवादीने मारली.
जामनेर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथे मंगळवारी जामनेर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन याना दिलेला धक्का असे वर्णन केले जात आहे. भाजपने या पक्ष प्रवेशाचे " राष्ट्रवादीचे उसने अवसान " या शब्दात वर्णन केले, तर " ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ," अशी कोपरखळी राष्ट्रवादीने मारली.
खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजन जिल्ह्यात घेतलेल्या बैठकीत खडसे यांच्या प्रवेशाने भाजपला भगदाड नव्हे छिद्रदेखील पडणार नाही, असे सांगत होते. मुक्ताईनगरमध्ये महाजन यांचे तेथील भाजप कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत खडसेंच्या जिव्हारी लागले. त्याचीच परतफेड म्हणून की काय तालुक्यातील सुमारे २०० भाजप कार्यकर्त्यांना खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील फार्म हाऊसवर प्रवेश देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है
प्रवेश जरी मुक्ताईनगरात झालेला असला तरी याची जळजळ आणि मळमळ मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जामनेरात भाजपला होत होती. भाजपचा बालेकिल्ला म्हणवून घेत असलेल्या महाजनांच्या मतदारसंघात. प्रवेश केलेले कार्यकर्ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, मात्र निवडणूक जवळ आल्यानंतर धाकदपटशाही, साम-दाम-दंड-भेद नीती वापरून त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले होते. दुखावलेले व नाराज कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडायला सुरुवात झाली असून, मुक्ताईनगरचा सोहळा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है.
- किशोर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख, जामनेर
" चांगदेव मुक्ताबाईला जाण्याचे सांगुन राष्ट्रवादीत ओढले
देवपिंप्री, नेरी येथील एकाही भाजप कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही. घरच्या भाकरी खाऊन गिरीश महाजनांसाठी झटणारे कार्यकर्ते भाजपात आहे. ज्यांनी प्रवेश केला ते राष्ट्रवादीचेच होते. महिला व लहान मुलांना चांगदेव मुक्ताबाईच्या दर्शनाला चला, असे सांगून नेले व जबरजस्तीने त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा रुमाल टाकून प्रवेश करवून घेतला.
-तुकाराम निकम, माजी तालुकाध्यक्ष, भाजप, जामनेर