दाखल्यांसाठी मनपाचे प्रवेशद्वार केले बंद
By admin | Published: January 11, 2017 12:41 AM2017-01-11T00:41:20+5:302017-01-11T00:41:20+5:30
मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले
जळगाव : मनपाकडून शहरातील दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना (बीपीएल) त्यासाठीच्या सव्र्हेच्या यादीत नाव असूनही मनपाकडून दाखला मिळत नसल्याने तो मिळावा, तसेच ज्यांचा यादीत समावेश नाही, त्यांचा या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी मानवी अन्याय, अत्याचार निवारण केंद्राचे उमाकांत वाणी यांच्या नेतृत्वात महिलांनी मनपासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत वाणी यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 1967 पासून बीपीएलचे सव्रेक्षण सुरूच आहे. मात्र शहरात सुमारे 50 हजाराच्या आसपास दारिद्रय़रेषेखालील नागरिक असताना केवळ 10-12 हजारांचा यादीत समावेश करण्यात आला असून त्यातील अनेकांना तर मनपाकडून दाखलाच मिळालेला नाही. तो मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी या आंदोलनस्थळी भेट देऊन नंतर आयुक्तांशीही चर्चा केली होती. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन मंगळवारीही सुरूच होते. विधवा महिलांना बीपीएलचा दाखला मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असूनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे मंगला बारी म्हणाल्या.