तक्रार अर्जावर सही केल्याने कुसुंबा येथे उद्योजकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:08 PM2020-03-08T12:08:06+5:302020-03-08T12:08:39+5:30
कंपनीतून बाहेर ओढून केली मारहाण
जळगाव : कुसुंबा येथील पोलीस पाटलाच्याविरोधात केलेल्या तक्रारी अर्जावर सही का केली या कारणावरुन साहेबराव जगन पाटील (४४, रा.कुुसुंबा, ता.जळगाव) या उद्योजकाला एमआयडीसीतील कंपनीत येवून रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (रा.कुसुंबा) व दत्ता उर्फ गोलु चौधरी यांनी मारहाण केल्याची घटना ५ रोजी रात्री ८ वाजता घडली. शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
साहेबराव पाटील यांची एमआयडीसीत सेक्टर व्ही-९४ मध्ये पीव्हीसी पाईप बनविण्याची कंपनी आहे. ५ रोजी रात्री ८ वाजता कंपनीत असताना राहूल रामचंद्र बºहाटे (रामेश्वर कॉलनी) व दत्ता उर्फ गोलु चौधरी (रा.तुकारामवाडी) असे दोघं जण दुचाकीवर आले. दोघांनी कार्यालयातून कॉलर पकडून पाटील याना बाहेर आणत असतानाच तेथे राजेंद्र दिलीप चौधरी हा देखील कंपनीच्या आवारात आला. तिघांनी पाटील यांना कपंनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणले असता तेथे बाहेर रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (रा.कुसुंबा) हा उभा होता. त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन पोलीस पाटील यांच्याविरोधात केलेल्या तक्रार अर्जावर तु सही केली म्हणून दत्ता चौधरी याने मारहाण केली.
चाकूचा धाक दाखवून धमकावले
ही घटना पाहून पाटील यांचा भाचा सागर पंडीत पाटील हा धावत आला व समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना दत्ता याने त्यालाही धक्का मारुन तु आमच्या भांडणात पडू नको असे म्हणत असताना राहूल रामचंद्र बºहाटे याने चाकूचा धाक दाखवून भावलाल नामदेव पाटील याच्या नादी लागू नको, त्याला आम्ही रविवारी मारणार आहोत असे म्हणत आमच्याविरुध्द पोलिसात तक्रार दिली तर जीवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली. या घटनेनंतर साहेबराव पाटील यांनी शुक्रवारी रात्री तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास गणेश कोळी करीत आहेत.