उद्योजकांचा विचार की केवळ निवडणुकांवर लक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:10+5:302021-02-09T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोकळ आश्वासने आहे, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणा म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोकळ आश्वासने आहे, असा आरोप विविध मुद्यांवरून केला जात आहे. याची प्रचिती जळगावच्या बाबतीतही येत असून येथील आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे विरोधकांकडून व उद्योजकांकडूनही सांगितले जात आहे. यात भुसावळचा कंटेनर डेपो बंद करण्यासह रेल्वे इंजिन कारखाना, उत्तर भारताशी व्यापारवाढीसाठी सोयीचा ठरणाऱ्या भुसावळ-भोपाळ तिसऱ्या रेल्वे मार्गाकडे होणारे दुर्लक्ष ही मोठी उदाहरणे असून आता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरची घोषणा हेदेखील पोकळ आश्वासन असल्याचा आरोपही केला जात आहे.
भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद झाल्याने याचा उद्योजकांना मोठा फटका बसला आहे. या निर्णयानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात काही सकारात्मक घोषणा होतील, अशी अपेक्षा उद्योजकांना होती. मात्र आयात-निर्यातीसाठी पूरक ठरतील, अशी घोषणा जिल्ह्यासाठी तरी नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कॉरिडॉर स्वप्न ठरू नये
अर्थसंकल्पात भुसावळ-खरगपूर काॅरिडॉरची घोषणा झाली असली तरी यामुळे केवळ देशांतर्गत व्यापाराला लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यातही हा कॉरिडॉर कधी साकारला जाईल व त्याचा उपयोग कधी होईल, या विषयीदेखील साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण ज्या भागाशी खान्देशला जोडण्याची घोषणा झाली आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने त्या डोळ्यासमोर ठेवूनच हे गाजर दाखविले गेले असावे, असे सांगितले जात आहे. हा कॉरिडॉर प्रत्यक्षात साकारला जावा, ते केवळ स्वप्न ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्यापारवाढीकडे दुर्लक्ष, पश्चिम मार्गाला झुकते माप
भुसावळात असलेला रेल्वे इंजिनचा कारखाना स्थलांतरित होण्यापाठोपाठ कंटेनर डेपो बंद झाला तरी या विषयी जिल्ह्यातील राजकीय मंडळींकडून हवा तसा पाठपुरावा होऊ शकला नाही व हे दोन्ही प्रकल्प जिल्ह्यातून गेले. या सोबतच जळगावातील केळी असो अथवा इतर औद्योगिक उत्पादनांची मोठी वाहतूक असलेल्या उत्तर भारताकडील रेल्वे मार्गाकडे कानाडोळा होत आहे. यात भुसावळ ते भोपाळ तिसरा रेल्वे मार्ग झाल्यास दिल्ली केवळ १२ तासात गाठता येईल व हे प्रवाशांसह उद्योग, व्यापार वाढीसाठी सोयीचे ठरणारे आहे. मात्र हा मार्ग झाल्यास पश्चिम रेल्वे मार्गाचे महत्त्व कमी होईल व गुजरात मार्गावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने या कडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. इतकेच नव्हे भुसावळ येथे प्रस्तावित असलेला रेल्वेचा कारखानाही देण्यास सरकारकडून टाळाटाळ होत आहे, असा आरोप होत आहे. या सर्व घडामोडी पाहता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असल्याने येथील जनतेसाठी केवळ हा देखावा असल्याचाही आरोप केला जात आहे.
—————-
भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर हे केवळ पोकळ आश्वासन आहे. भुसावळातील इंजिन कारखाना, कंटेनर डेपो येथून गेले. भुसावळ-भोपाळ तिसऱ्या रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष व रेल्वे कारखान्यासाठी काही हालचाली नसताना पश्चिम बंगालमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार केवळ दिशाभूल करीत आहे.
- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार.
भारतीय कंटेनर महामंडळाचा डेपो भुसावळातच राहावा, यासाठी आपण प्रयत्न केले. मात्र आता त्याला भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे पर्यायी व्यवस्था होणार असल्याने ती सोयीची होईल. ती व्यवस्था झाली नसती तर आपण आणखी कठोर भूमिका घेतली असती.
- उन्मेष पाटील, खासदार.
भुसावळातील कंटेनर महामंडळाचा डेपो बंद झाल्याने त्याचा आयात-निर्यातीवर मोठी परिणाम होत आहे. आता भुसावळ-खरगपूर कॉरिडॉर होणार आहे, त्याचे स्वागत आहे. मात्र यामुळे केवळ देशांतर्गत व्यापार वाढ होऊ शकते.
- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, जळगाव पाईप मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री असोसिएशन.