कपाशी पिकांवर शेंदरी बोंडअळीची एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:13+5:302021-07-29T04:18:13+5:30
येथून जवळच असलेल्या कुंभारी खुर्द (ता. जामनेर) परिसरातील शेतकरी ईश्वर ओंकार कोळी यांनी केलेल्या शेतात जवळपास पाच एकर क्षेत्रात ...
येथून जवळच असलेल्या कुंभारी खुर्द (ता. जामनेर) परिसरातील शेतकरी ईश्वर ओंकार कोळी यांनी केलेल्या शेतात जवळपास पाच एकर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड दि. ६ जूनला केली होती. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने ईश्वर कोळी आणि त्यांच्या पत्नीसह मुले, मुली घरच्या घरी शेतामध्ये काबाडकष्ट करून आपला संसार चालवतात. शेतात रात्रंदिवस मेहनत करून चांगले उत्पन्न घेण्याच्या प्रयत्नात असतानाच कपाशी पिकावर शेंदरी बोंडआळीने हल्ला केल्याने कोळी हे पूर्णपणे हतबल झाले आहेत.
कधी पावसाचा, तर कधी अवकाळी पावसाचा तर कधी रोगराईचा सामना करताना वर्षानुवर्षे कळा सोसल्या. यंदा चांगले उत्पन्न घेण्याच्या तयारीत असतानाच कपाशी पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतच फुलामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कोवळ्या झाडावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गासाठी हा एक चिंतेचा विषय ठरत आहे.
ईश्वर कोळी यांनी याबाबत कृषी विभाग जामनेर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता कृषी सहाय्यक एस. व्ही. टेमकर, कृषी पर्यवेक्षक एस. ओ. आहिरे, शेती शाळा समन्वयक पी. एस. इक्कर यांनी कोळी यांच्या शेतात भेट देऊन कपाशी पिकाची पाहणी केली. त्यांनादेखील कपाशी पिकावर फकडी पडत असून फुलोऱ्यात आलेल्या कपाशीवरील डोमकळीमध्ये अळी आढळून आली. जवळपास कपाशी लावलेल्या पूर्ण क्षेत्रावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून आले. हा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी अधिकाऱ्यांनी कपाशीच्या झाडावरील डोमकळी तोडून त्यांची पूर्ण पणे जमिनीत पुरुन विल्हेवाट लावणे तसेच एकरी पाच फेनोमेन ट्रॅप लावणे तसेच वेळोवेळी निरीक्षण करून ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी करण्यास सांगितले आहे.
१. फरदडवर लवकर लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. शेतकरीवर्गाने घाबरून न जाता अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कपाशीच्या डोमकळ्या तोडून जमिनीत पुरुन नष्ट कराव्यात. फेनोमेन ट्रेप लावणे व वेळोवेळी निरीक्षण करने तीन दिवसात ट्रेपमध्ये ६ ते ८ पेक्षा नर पतंग आढळल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. कुंभारी खुर्द येथील ही घटना तालुक्यातील पहिलीच असून शेतकरी ईश्वर कोळी यांची पहिली असून शेतकऱ्यांनी व्यवस्थित निरीक्षण आणि नियोजन केल्यास इळीचा प्रादुर्भाव टाळता येवू शकतो.
-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी
गेल्या दीड महिन्यापूर्वी ६ जून रोजी कपाशी पिकाची लागवड केली असून कृषी विभागाच्या अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून सांगितल्याप्रमाणे फवारणी करीत आहे. या परिसरात मी लावलेल्या कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून मी पूर्णपणे हतबल झालो आहे. ही बोंड आळी लवकर नियंत्रणात न आल्यास या शेतात रोटोवेटर फिरविल्याशिवाय कोणताच पर्याय राहणार नाही.
-ईश्वर ओंकार कोळी, शेतकरी, कुंभारी खुर्द ता. जामनेर
280721\28jal_16_28072021_12.jpg
शेतात पाहणी करताना शेती शाळा समन्वयक पी. एस. इक्कर, शेतकरी ईश्वर कोळी आदी. (छाया : अर्पण लोढा)