बाभुळगावच्या दोन गटांना पर्यावरण समितीची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:49+5:302021-02-17T04:21:49+5:30
जिल्हा खनिकर्म विभागाची वाळु लिलाव प्रक्रिया सुरू लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बाभुळगाव ता. धरणगाव येथील दोन वाळु गटांना ...
जिल्हा खनिकर्म विभागाची वाळु लिलाव प्रक्रिया सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाभुळगाव ता. धरणगाव येथील दोन वाळु गटांना शुक्रवारी पर्यावरण समितीने मंजुरी दिली आहे. पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर या दोन गटांसाठी जिल्हाधिकारी खनिकर्म विभागाच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. यात बाभुळगाव एक या गटात २७३५ ब्रास वाळु उत्खनन केले जाऊ शकते. तर दुसऱ्या गटात ३९३३ ब्रास वाळु आहे.
जिल्ह्यातील २१ वाळु गटांना राज्याच्या पर्यावरण समितीने मंजुरी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी बाभुळगाव एक आणि बाभुळगाव दोन या गटांना ही मंजुरी देण्यात आली आहे. लगेचच जिल्हा प्रशासनाने या दोन्ही गटांच्या वाळु प्रक्रियेला सुरूवात देखील केली. या दोन्ही गटांची ऑफसेट प्राईज एक कोटींच्या वर आहे.
१३ वाळु गटांसाठी फेर निविदा
काही दिवसांपुर्वी जिल्ह्यातील २१ वाळु गटांची लिलावप्रक्रिया राबवण्यात येत होती. त्यातील फक्त ८ गटांना प्रतिसाद मिळाला. उरलेल्या १३ गटांसाठी आता फेर निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या १३ गटांसाठी कुणीही बोली लावली नाही.
१२ गट मंजुरीच्या प्रतिक्षेत
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध १२ वाळु गटांचे प्रस्ताव राज्य हरित लवादाकडे पाठवले आहेत. या वाळु गटांना देखील लवकरच मंजुरी मिळु शकते.