वारीला दिली पर्यावरणाची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:39 PM2019-06-15T21:39:25+5:302019-06-15T21:42:06+5:30
मंगेश महाराज जोशी : मुक्ताई पालखीचे स्वागत जणू दिवाळी
चंद्रशेखर जोशी
जळगाव : संत मुक्ताई पालखीचे हे १४७ वे वर्ष. संत आप्पा महाराज यांना झालेल्या दृष्टांतानंतर पालखीला सुरूवात झाली. गावागावात मुक्ताईची पालखी पोहोचते त्यावेळी प्रत्येक व्यक्तीत पांडुरंग अवतरल्याचा साक्षात्कार होतो. अतिशय आनंदाने, उत्साहाने पालखीचे स्वागत होते. वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे वारीस पर्यावरणाची जोड देण्यात आल्याची माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
शनिवारी संत मुक्ताई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्यामुळे मंगेश महाराज जोशी यांच्याशी झालेली बातचित पुढील प्रमाणे.
प्रश्न : पालखीची सुरूवात कधी व कुणाच्या पुढाकारातून झाली ?
मंगेश महाराज : १८७२ पासून संत मुक्ताई पालखीला प्रारंभ झाला. हे या पालखीचे १४७ वे वर्ष आहे. संत आप्पा महाराज यांना दृष्टांत झाला होता. त्यात त्यांना झालेल्या दृष्टांतानंतर वारीस प्रारंभ झाला.
प्रश्न : पालखी ठिकठिकाणी जाते त्यावेळचा अनुभव काय?
मंगेश महाराज : सुमारे एक हजार किलो मिटरचा प्रवास करत असताना गावागावात ज्या वेळी मुक्ताईची पालखी जाते त्यावेळी दिवाळीचा आनंद व्यक्तीव्यक्तीच्या चेहेऱ्यावर दिसतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, आदिशक्ती संत मुक्ताई की जय...आप्पा महाराज की जय.. अशा घोषणा व त्या साथीला टाळ- मृदुंगाचा गजर असे अतिशय उत्साही वातावरण गावागावात असते. काही ठिकाणी तर पालखीच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या जातात. तो आनंद सोहळा असतो.
प्रश्न : पालखीचे काही वैशिष्ठय असेल काय?
मंगेश महाराज : निश्चितच. वारीत केवळ वृद्ध व्यक्ती असतात असे नाही. तरूण, तरूणी, महिला-पुरूष सर्व वयोगटातील व्यक्तींचा सहभाग यात असतो. सध्या पर्यावरणाचा झालेला -हास लक्षात घेऊन वन क्षेत्रातून पालखी जात असताना बिजारोपण आम्ही करणार आहोत. तीन-चार वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. पर्यावरण पुरकतेची जोड पालखी सोहळ्याला देण्यात आली आहे.
कालानुरूप केले काही बदल
पालखी सोहळ्याबाबत बोलताना मंगेश महाराज म्हणाले. कालानुरूप काही स्वागतार्ह बदल आपण केलेले आहेत. तीन-चार वर्षापूर्वी सर्व यात्रेकरूंना आंब्याच्या कोयी-चिकू, सीताफळ, जांभुळ आदी फळांच्या बिया घरून आणायला सांगून प्रवास मार्गात त्या बिया फेकत वाटचाल करतो. या उपक्रमामुळे वृक्षवल्ली वाढून त्यात दिंडीचे योगदान वाढणार आहे. तसेच ज्या मंदिरात दिंडीचा मुक्काम असेल तिथल्या देवतेला नवे कपडे आणि मंदिर स्वच्छता असा उपक्रम राबविण्यात येत असतो.
प्रश्न : दिंडीच्या परंपरांबाबत काय सांगाल ?
मंगेश महाराज : जळगाव ते पंढरपूरपर्यंत जाताना मुक्ताईचा प्रसाद म्हणून महाराज चुरमुºयाचा प्रसाद देत व येताना काल्याचा लाह्यांचा प्रसाद देत असत. तीन परंपरा आजही कायम आहे. पंढरपूर चिंचोली येथे संत निवृत्तीनाथ व मुक्ताईची पालखी एकत्र येते त्यावेळी पालखी भेटीचा सोहळा अवर्णनीय असतो.