समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक - हर्षल विभांडीक यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 04:06 PM2019-03-25T16:06:59+5:302019-03-25T16:09:19+5:30
समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.
चाळीसगाव, जि.जळगाव : समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.
सी.आर.कळंत्री विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असून, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षण हा खरा केंद्रबिंदू राहिला आहे. शिक्षण क्षेत्रात दररोज काहीना काही नवीन घडत असते. त्या बदलाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील शाळांना जगातील प्रगत देशातील शाळांशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन बदलत्या जागतिक प्रवाहांशी त्यांची ओळख होईल. जिल्हा परिषदेसह अनेकविध भागातील मराठी माध्यमाची शाळा डिजीटल करणे हा त्यातीलच एक भाग राहिला आहे. शाळेत होत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक असे सर्वांगीण संस्कारक्षम उपक्रम हे प्रशंसनीय राहिले आहे. यातूनच भारताला जागतिक पातळीवर समर्थ राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.
यावेळी सी.आर.कळंत्री विद्यालयात डीजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, सचिव डॉ.विनोद कोतकर, सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत, संचालक राजेंद्र चौधरी, मु.रा.अमृतकर, क.मा.राजपूत, सुरेश स्वार, योगेश अग्रवाल, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेहता आॅडीटोरीयम सभागृहात सोमवारी सकाळी ९ वाजता वर्षभरात शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, आदर्श विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी, तर सूत्रसंचालन स्मिता चित्ते, मनीषा पाटील यांनी, तर दीपाली पाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.