सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्वयंरोजगार संकुल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:17+5:302021-02-20T04:46:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ब्रिटिशकालीन ग्रामपंचायतीच्या जागी सुसज्ज कार्यालय व गावातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ...

Equipped Gram Panchayat office, self-employment complex will be set up | सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्वयंरोजगार संकुल उभारणार

सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्वयंरोजगार संकुल उभारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : ब्रिटिशकालीन ग्रामपंचायतीच्या जागी सुसज्ज कार्यालय व गावातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून प्रशस्त ग्राम स्वयंरोजगार संकुलाची उभारणी करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच हेमंत चौधरी यांनी केले. विकासाला चालना देऊन मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सरपंच चौधरी यांनी गावाच्या विकासासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तापी नदीवरील सामूहिक योजनेच्या माध्यमातून यापुढील काळात ममुराबाद गावाला विनाव्यत्यय पाणीपुरवठा केला जाईल. पंपिंग सेंटरवरील सबमर्सिबल पंप अद्ययावत ठेवून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालविले जाईल. ममुराबाद गावातील अंतर्गत जलवाहिनी कालबाह्य झाली आहे, ती बदलून सगळीकडे समान दाबाने पाणी वितरीत होईल, याचीही काळजी घेण्यात येईल. महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचा वापर वाढविण्यासाठी नियमित देखभालीवर भर द्यावा लागणार आहे. स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला जाईल. गावातील कच्चे रस्ते व गटारी काँक्रिटीकरण करण्यासाठीही पाऊले उचलली जातील. ग्रामस्थांनीसुद्धा घरपट्टी व पाणीपट्टी कर नियमितपणे भरून ग्रामपंचायतीला वेळोवेळी सहकार्य करावे. जेणेकरून विकासाला खीळ बसणार नाही, असेही सरपंच चौधरी यांनी नमूद केले.

Web Title: Equipped Gram Panchayat office, self-employment complex will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.