बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेसह यंत्रणाही सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 12:14 PM2020-08-19T12:14:28+5:302020-08-19T12:14:41+5:30
बाजारात गणराय दाखल : विघ्नहर्त्याच्या आगमाने कोरोनासह मंदीचे संकट होणार दूर
जळगाव : गणेशोत्सवासाठी बाप्पा बाजारात दाखल झाले असून विविध प्रकारच्या मनोवेधक मूर्र्तींनी बाजारपेठ सजली आहे. या सोबतच जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून विविध मंडळांकडूनही तयारी केली जात आहे.
यंदा कोरोनाचे संकट असल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी नियमांचे पालन करीत उत्साह कायम राहणार असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे गेल्या सहा महिन्यांपासून असणाऱ्या कोरोनाच्या विघ्नासह बाजारपेठेतील मंदीचेही विघ्न दूर होऊन खरेदी वाढून पुढील काळ चैतन्य घेऊन येणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
घराघरात गणेश मूर्तींची स्थापना केली जाते़ त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी मूर्तीकारांनी यंदा देखील शहरात विविध ठिकाणी दुकाने थाटलेली आहेत़ यामुळे वातावरण पूर्णपणे बाप्पामय होऊन गेले आहे़ सागर पार्क, जी.एस. मैदान, अजिंठा चौफुली, गिरणा टाकी परिसर आदी ठिकाणी ही दुकाने लावण्यात आलेली आहेत़
कच्या मालाच्या वाढत्या महागाईमुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्के भाववाढ झालेली असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे़
प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी), काथ्या, रंग, मॉडेल्स, साचे व वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे मूर्तीचे भाव वाढलेले आहेत़ शंभर रुपयामागे १५ ते २० रुपये वाढ झालेली असल्याचे मूर्ती विक्रेत्यांचे म्हणणे आहे़
तसेच शाडू मातीच्या मूर्र्तींची किंमतदेखील महागाईमुळे वाढलेली आहे़ पर्यावरणपूरक असलेल्या या मूर्तींच्या किंमतीतही १५ ते २० टक्के वाढ झालेली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे़
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. विनापरवानगी गणेशाची स्थापना केली तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक व एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असून येत्या दोन दिवसात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा व पोलिसांना सहकार्य करावे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक
कोरोनाच्या महामारीचे सर्वांसमारे आव्हान आहे. चांगल्या सामाजिक उपक्रमांची पूजा मांडून कोरोनाच्या पार्श्वभूीवर साजरा होणारा गणेशोत्सव सर्व मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करतील. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल. या संदर्भात विविध मंडळांच्या कार्यर्त्यांनाही आवाहन केले जात आहे.
- सचिन नारळे, अध्यक्ष,
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ
२३२१ मंडळातर्फे गणेशोत्सव
मोहरम, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची तयारी झाली असून यंदाच्या गणेशोत्सवात २ हजार ३२१ मंडळातर्फे साजरा केला जाणार आहे. तशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
‘इको फ्रेण्डली’ मूर्तींची नोंदणी
पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी भाविक यंदाही जागृत दिसत आहे. त्यानुसार ‘इको फ्रेण्डली’ गणेशमूर्तींच्या नोंदणीसाठी भाविक पसंती देत आहे. यात शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती दुकानांवर उपलब्ध होत आहेत.
अशी आहे नियमावली
-सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीची उंची ४ फुटापेक्षा अधिक नको
-घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपेक्षा जास्त नको
-पूजा व आरतीसाठी ५ पेक्षा अधिक व्यक्ती नको
-पदाधिकाºयांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये
-परवानग्यांसाठी एक खिडकी योजना