एरंडोल येथे पुरात १५ झोपड्या गेल्या वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 04:12 PM2019-09-13T16:12:01+5:302019-09-13T16:12:04+5:30
पुरात अडकलेले ५ जण बचावले : हनुमंतखेडे व मजरे गावात शिरले होते पूराचे पाणी
एरंडोल - बुधवारी दुपारपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी धरण ओव्हरफ्लो झाले. हे धरण ८० टक्के भरत असतांना अंजनी नदी काठावरील हनुमंतखेडे व मजरे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले.तसेच एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहासमोरील आदिवासींच्या झोपड्या वाहून गेल्याने सुमारे १५ परिवार निराधार झाले आहे. यावेळी एका परिवारातील पावरा समाजतील ५ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना दोराच्या सहाय्याने वाचविण्यात आले.
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस व पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाय योजना केल्या. अंजनी धरण ८० टक्के भरले असतांना रात्री साडे अकरा वाजता अंजनी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. पहाटे चार वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु होता.
कासोदा परिसरात अतिवृष्टी
कासोदा परिसरात १०२ मि.मी.अर्थात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. धुंवाधार पाऊस अंजनी नदीला आलेला पुर व अंजनी धरणाचा पाण्याचा विसर्ग यामुळे हनमंत खेडे,मजरे,सोनबर्डी, नांदखुर्द बु.,नांदखुर्द खु.,एरंडोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असुन पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.याशिवाय अंजनी धरणाच्या परिसरातील नदी काठा लगतच्या भागात कासोदा, आडगाव, तळई, फरकांडे, उमरे व इतर गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अंजनी धरणाला लागुन असलेल्या काळा बांधा-या नजीकच्या शेतामध्ये पाणी प्रवाहीत झाल्यामुळे पिके उध्वस्त झाली आहे.
एरंडोल येथे पाच जणांचे वाचले प्राण
एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहा समोरील भागात पाण्याचा प्रवाह पाहता नगर पालिकेतर्फे सतर्कतेचा इशारा देऊन या आदिवासी परिवारांना झोपड्या खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. नंतर झोपड्या वाहुन गेल्या. यात प्रेमराज रामसिंग बारेला यांचे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले. त्या परिवारातील पाच जणांनी तीन ते चार तास एका काटेरी झाडाचा आधार घेतला.त्यांना दोर टाकुन बाहेर सुरक्षित काढण्यात आले.यावेळी काही युवकांनी व नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी मदत कार्य केले.मुकेश प्रेमलाल बारेला, दुगार्बाई प्रेमलाल बारेला, रामाबाई बारेला, प्रेमलाल बारेला तर दुस-या झाडावर सीताराम बारेला हा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत होता.त् यालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.म्हसावद रस्त्यावरील जुन्या फरशीला तडे गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. स्मशानभूमीची संरक्षक भिंत, कासोदा दरवाज्या नजीकची भिंत, आठवडे बाजारा नजीकची संरक्षक भिंत अंशत: कोसळल्यामुळे हानी झाली आहे.
महादेव मंदिराला पाण्याचा वेढा
एरंडोल येथील आठवडे बाजार परिसरातील महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला होता.आठवडे बाजार व बुधवार दरवाजा समोरचा रस्ता अंजनी नदीचा प्रवाह बनला होता.जवळपास ४० वषार्नंतर अंजनी नदीला मोठा पुर आल्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती.गुरुवारी दुपारी अंजनी धरणाच्या तिन पैकी एका गेटची दुरुस्ती करण्यात आली.