गिरणेच्या पाणीसाठ्यामुळे एरंडोलचा पाणीप्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:06 PM2019-08-22T21:06:23+5:302019-08-22T21:06:30+5:30
एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा ...
एरंडोल : गिरणा धरणात ७८ टक्के पाणीसाठा झाला असून अंजनी धरण मृत साठ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे एरंडोल तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व काही प्रमाणात शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
गिरणा धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळे एरंडोल तालुक्यातील कासोदा व सोळा गाव सामूहिक पाणीपुरवठा योजनेला जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे कासोदा, आडगाव, तळई परिसरातील पिण्याचा प्रश्न सुटलेला आहे. तसेच गिरणा निम्म कालवा व जामदा कालवा यांना आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे कालवा क्षेत्रात भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय रब्बी हंगामासाठी गिरणा चे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पारोळ्यातील शिरसमणी, टिटवी, व चोरवड या अंजनी नदीच्या उगम परिसरात मुसळधार पाऊन झाल्यामुळे अंजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन ९५ टक्के मृत साठा निर्माण झाला आहे. अजून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे अंजनी धरण आता मृत साठ्यातून बाहेर पडून जिवंत साठ्यात पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एरंडोल शहराचा देखील पाणीप्रश्न मिटत आहे. गिरणा व अंजनी या एरंडोल तालुक्यात धावून आल्यामुळे सर्वत्र आबादानी आणि पसरली आहे.