चार मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:15 PM2018-10-25T13:15:25+5:302018-10-25T13:15:48+5:30
मालेगाव तालुक्यातून घेतले दोघांना ताब्यात
जळगाव : सासरी असलेल्या मुलीला कपडे देऊन येते असे सांगून पतीची दिशाभूल करुन चार मुलांच्या आईने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. १० दिवस तपास केल्यानंतर या महिलेला व तिच्या प्रियकराला बुधवारी पोलिसांनी मालेगाव तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका महिलेचे (वय ३६) तिच्या माहेरच्या गावाच्या शेजारी असलेल्या गावातील एकाशी (वय ४०) प्रेमप्रकरण बहरले होते. या महिलेला दोन मुली व दोन मुले अशी चार अपत्य आहेत. त्यापैकी दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. अनुक्रमे १४ व १० वर्षाचे दोन मुले व पतीसोबत ही महिला भडगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सुनील पाटील यांच्या शेतातील घरात राहत होती. पती हा पाटील यांच्याकडे सालदार म्हणून कामाला आहे. ८ आॅक्टोबर रोजी या विवाहितेने पतीजवळ येऊन सांगितले की, धुळे तालुक्यात दिलेल्या मुलीचा फोन होता. आपल्याकडे शिवण्यासाठी टाकलेले ब्लाऊज व इतर कपडे घेऊन ती मला तिच्या सासरी बोलवत असल्याने मी तेथे जात असल्याचे सांगून ही महिला त्या दिवशी घरातून गेली. पाच दिवस झाले तरी पत्नी अजून का येत नाही म्हणून पतीने पत्नीला फोन लावला, मात्र तो बंद येत होता. मुलीशी संपर्क केला असता आई माझ्याकडे आलीच नाही असे मुलीने सांगितल्यावर पतीला धक्काच बसला. त्यामुळे पतीने १३ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला पत्नी हरविल्याची तक्रार दिली.
मालेगाव तालुक्यात थाटला संसार
महिला हरविल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शालिक कुंभार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याशी संपर्क केला. हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, चंद्रकांत पाटील यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर माहिती काढली असता या विवाहितेने दुसऱ्या फोनवरुन मुलीला फोन केला होता. त्यातून ही विवाहिता मालेगाव तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बुधवारी महिला राहत असलेले ठिकाण गाठले असता ती प्रियकरासोबत आढळून आली.
विवाहिता पतीच्या स्वाधीन
प्रियकराचे गाव हे महिलेच्या माहेर शेजारीच आहे. प्रियकराचेही लग्न झालेले असून त्याला एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगी लग्नाच्या वयाची आहे. प्रेमात आकंत बुडाल्याने दोघांनी पळून जावून संसार थाटला होता. दरम्यान, बुधवारी मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणल्यानंतर विवाहितेला पतीच्या स्वाधीन करण्यात आले.