‘जीवनावश्यक’ही बंद, भाजीपाला मिळेल घरपोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:51 AM2020-07-07T11:51:19+5:302020-07-07T11:51:30+5:30
शेतकरी गटांची मदत : बाजार समितीमध्ये गर्दीला निर्बंध
जळगाव : या पूर्वी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान सुरू होत्या. आता या वेळी केवळ औषधी व दूध विक्री सुरू राहणार आहे. किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीही बंद राहणार असून शासन व्यवस्थेनुसार नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळणार आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये कृषि उत्पादने विक्रीसाठी कुठलेही बंधने नसून शेतमाल व फळांची वितरण व्यवस्था कृषि विभाग तसेच शेतकरी गटांमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरोकळ विक्रेते तसेच नागरिकांना प्रवेश राहणार नाही. तेथे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृउबा सचिवांवर राहणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहरात नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था यांच्यामदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची माहिती मोबाईल अॅपवर साठविण्यात येणार असून आवश्यकता भासणाºया नागरिकांचे ‘स्वॅब कलेक्शन मोबाईल व्हॅन’मार्फत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुकाने सुरू असल्यास कारवाई
लॉकडाऊनमध्ये फेरीवाले, ठिकठिकाणी दुकाने लावणारे विक्रेते तसेच औषधी व दूध केंद्राव्यतिरिक्त इतर दुकानेही बंद राहणार आहेत. परवानगी नसलेली दुकाने सुरू असल्यास अथवा फेरीवाले, अतिक्रमण आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिला. या लॉकडाऊन दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना काही अडचण असल्यास त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.