कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी द्विस्तरीय यंत्रणांची समिती स्थापना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:59+5:302021-03-17T04:16:59+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग हा स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी जळगाव, जामनेर तालुक्यांमध्ये ‘प्रभागस्तरीय कोरोना दक्षता पथक आणि गाव, ...
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग हा स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी जळगाव, जामनेर तालुक्यांमध्ये ‘प्रभागस्तरीय कोरोना दक्षता पथक आणि गाव, परिषदस्तरीय कोरोना नियंत्रण समिती’ अशी द्विस्तरीय यंत्रणांची स्थापना करण्यात यावी, असा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढला आहे.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. सध्या जळगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला आहे. हळूहळू जामनेर तालुक्यातही कोरोना पाय पसरवत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी द्विस्तरीय यंत्रणा स्थापना करण्याच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत.
समितीत यांचा असेल समावेश
गावस्तरीय/नगरस्तरीय कोरोना नियंत्रण समितीच्या अध्यक्षस्थानी सरपंच/नगराध्यक्ष असतील. सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक/मुख्याधिकारी तर सदस्य म्हणून मुख्याध्यापक, तलाठी व शिक्षक यांचा समावेश असेल. या समितीला प्रभागनिहाय कोरोना दक्षता पथके स्थापन करावयाचे आहे. तसेच लोकसंख्येनुसार प्रभागामध्ये एकापेक्षा अधिक दक्षता पथके स्थापन करण्याचा अधिकार समितीला राहील. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दररोज कोरोनाच्या माहितीची देवाण-घेवाण करून प्रभागस्तरीय दक्षता पथकांना आवश्यक त्या सूचना समितीला करावयाच्या आहे. गावात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचीही सूचना या समितीला करण्यात आली आहे.
हे असतील प्रभागनिहाय कोरोना दक्षता पथकात
प्रभाग निहाय कोरोना दक्षता पथकामध्ये ग्रामपंचायत सदस्य/नगरसेवक, महिला बचत गट सदस्य, शिक्षक, आशा वर्कर/आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी/नगरपरिषद कर्मचारी/कोतवाल/पोलीस पाटील यांचा समावेश असेल. गृह विलगीकरण असलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक क्षेत्राचा फलक लावणे, बाधिताच्या संपर्कातील संशयितांचा शोध घेणे, चाचणी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, कोरोनाबाबत जनजागृती करणे आदी जबाबदारी या पथकावर निश्चित करण्यात आली आहे.