पातोंडा येथे वानरदेव प्रतिमेची स्थापना व मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:52+5:302021-07-05T04:12:52+5:30
पातोंडा, ता. अमळनेर: गावांवर कोणत्याही प्रकारची संकट येऊ नये,यासाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात मृत्यू पावलेल्या माकडाच्या (वानर) प्रतिमेची मिरवणूक काढून ...
पातोंडा, ता. अमळनेर: गावांवर कोणत्याही प्रकारची संकट येऊ नये,यासाठी गेल्या नोव्हेंबर महिन्यात मृत्यू पावलेल्या माकडाच्या (वानर) प्रतिमेची मिरवणूक काढून व विधिवत हवन पूजाअर्चा करून श्री हनुमान मंदिर प्रांगणात रविवारी स्थापना करण्यात आली.
श्री दत्त मंदिरच्या मागील बाजूस दि. २६ नोव्हेंबर २० रोजी एक माकड मृतावस्थेत आढळून आले आहे होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मानवाप्रमाणे मृत माकडाची अंत्ययात्रा काढून दहा दिवस सुतक पाळले. शेकडो ग्रामस्थांनी मुंडन केले होते. दशक्रिया व उत्तरक्रिया विधी विधिवत पार पाडला होता. गाव वर्गणीतून गाव पंगत दिली गेली.त्यावेळी मृत माकडाची स्थापना करावी जेणेकरून गावावरील संकट निवारण होईल असा ग्रामस्थांचा आग्रह होता.
मृत वानराची स्थापना न झाल्याने पाऊस पडत नाही, अशी शंका मनात शिरली. गावांवर दुष्काळी परिस्थिती निर्माण होणे, पाऊस न पडणे, गावात काही दुःखद आकस्मित घटना न घडणे, अशा अनेक प्रकारची संकटे येऊ नये. सध्या तर पाऊस पडलाच नाही. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. वानर हा हनुमानाचाच अवतार आहे. हनुमान संकट मोचन आहे. या संकटांचा भावनिक सारासार विचार करून वानर भक्तांनी माकडाची प्रतिमा स्थापन करण्याचे आयोजन केले.
त्यानुसार आज दि. ४ रोजी सकाळी संपूर्ण गावातून सुवाद्य अशी ट्रॅक्टरवर वानरदेव प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकी पुढे कळसधारी बालकुमारी होत्या. तसेच श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात दोन फूट उंचीची सुरेख अशी वानर प्रतिमेची मूर्तीची चौथऱ्यावर विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.