भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी भूगोल परिषदेची स्थापना-प्रा.भरत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 02:33 PM2020-12-19T14:33:35+5:302020-12-19T14:34:01+5:30
संडे स्पेशल मुलाखत
संजय पाटील
अमळनेर : मानवी जीवन भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. भूगोल हे गतिमान शास्र आहे. असे असतानाही विद्यार्थी भूगोल विषयाला फारसे महत्व देत नाहीत. इंजिनियरिंगला जाणारे विद्यार्थी भूगोल विषय घेत नाहीत, तर वैद्यकीय क्षेत्रात जाणारे नावाला भूगोल विषयाचा अभ्यास करतात. त्यामुळे भूगोल विषयात विद्यार्थ्यांना आवड, रुची निर्माण व्हावी, त्यातील सखोल ज्ञान मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. परिषदेचा उद्देश सर्वसामान्यांना कळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेची स्थापना केल्याचे कोषाध्यक्ष प्रा.भरत पाटील यांची ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न- तुम्ही स्वतः शिक्षण घेताना भूगोल विषय का निवडासा वाटला?
उत्तर- आधीपासूनच पर्यावरण, निसर्गाची आवड होती. निसर्गातील विविधतता आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
प्रश्न - कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद स्थापन करण्याची गरज का भासली ?
उत्तर- वरिष्ठ महाविद्यालयीन परिषदेत कनिष्ठ प्राध्यापकांचा समावेश नव्हता आणि सर्वाधिक भूगोल शिकणारे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात आहेत. अकरावी, बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांत भूगोल विषय शिकवला जातो म्हणून भूगोलाचा प्रभाव मुलांवर पडण्यासाठी प्रा.सतीश शिर्के, प्रा.युवराज खुळे, प्रा.मनोज देशमुख व मी मिळून भूगोल परिषदेची स्थापना केली.
प्रश्न- भूगोल परिषदेच्या माध्यमातून कोणती कार्ये करण्यात येणार आहेत?
उत्तर- निसर्ग (पर्यावरण) हीच मोठी भूगोलाची प्रयोगशाळा आहे. युद्ध, व्यापार, शेती, उद्योग हे भौगोलिक अभ्यास करूनच विकसित केले जातात. त्यामुळे राष्ट्र सक्षम होण्यासाठी भूगोलाचे ज्ञान विद्यार्थी व युवकांमध्य रुजवण्यासाठी परिषदेमार्फत चर्चासत्रे, व्याख्याने, शोधनिबंध, सहली असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
प्रश्न- पूर्वीचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम यात काय बदल आहेत?
उत्तर- पूर्वी पारंपरिक पद्धतीने सर्वेक्षण अथवा भूगोलाचा अभ्यास केला जात होता आता जिओ ऍपद्वारे मोबाईलमधून शेतकरी कुटुंबाचा सर्वे, आर्थिक सर्वे केला जातो.
प्रश्न- भूगोलाची आवड निर्माण करण्यासाठी नव्याने काय बदल अपेक्षित आहेत?
उत्तर- विज्ञान विषयाप्रमाणे भूगोल विषयात प्रात्यक्षिक तासिका असाव्यात, दहावीपर्यंत भूगोल विषय १०० गुणांचा करणे, एच.एस.सी. परीक्षेत विज्ञान विषयाप्रमाणे ७०-३० पॅटर्न राबवण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहे.