कोरोनाविषयक निधी वितरणासाठी तांत्रिक समितीची केली स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:45 AM2020-06-17T11:45:45+5:302020-06-17T11:46:00+5:30
समितीच्या मंजुरीनंतरच निधी : यंत्र अन् औषध सामुग्रीवर खर्च
जळगाव : कोरोनाशी लढण्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या मंजुरीनंतरच हा निधी वितरित केला जात आहे. कोरोनाविरोधी लढ्यासाठी विविध यंत्रसामुग्री सज्ज करण्यात आली असून आतापर्यंत यायंत्रसामुग्रीवरच कोट्यवधीचा खर्च करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बळकटीकरण व व्हीआरडीएल प्रयोगशाळेची उभारणी करणे आदी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे तर आयुक्त यांच्याकडून प्राप्त निधीतील १ कोटी ७७ लाख ३३ हजार तर जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत १ कोटी २८ लाख ५५ हजार रूपयांचे वितरण जिल्ह्यातील विविध यंत्रणांना वितरीत केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदस्य, तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.
- भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे वातानूकुलित यंत्रणा, भुसावळ ग्रामीण रुग्णालय येथे वातानुकूलीत यंत्रणा व पंपाकरीता स्टार्टर व स्ट्रीट लाइट उभारण्यात आली असून त्यावर ४ लाख ४४ हजार रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. कोविड -१९ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र्रासाठी औषध व साधन सामग्री खरेदी करणे अशा एकूण २७ बाबींसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना १ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करणे व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या कार्यपध्दतीचा अवलंब करून आतापर्यंत ११ कोटी ८२ लाख ४६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव शहर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे तळमजल्यावर २० खाटांचा अतिदक्षता विभाग व पहिल्या मजल्यावर ६० खाटाचे आयसोलेशन वॉर्डकरीता मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम बसविण्यासाठी १ कोटी २८ लाख ५५ हजार रुपये देण्यत आले आहेत.
कोरोनाच्या काळातील महत्त्वाची कामे
- व्हीआरडीएल लॅब उभारणीसाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना ५९ लाख १७ हजार रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या प्रयोगशाळेत यूपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी १८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी दिला आहे.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास १ कोटी ३३ लाख ६४ हजार रुपयांच्या निधी बळकटीकरणांतर्गत दिला. त्याचबरोबर इमारतीमधील डागडुजीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ३३ लाख ७० हजार रुपयांचा निधी दिला आहे.
- कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी विविध यंत्रसामुग्री तसेच वॉर्डमध्ये नवीन आयसीयूकरीता यूपीएस व वीज संच मांडणी, वातानुकूलित यंत्रणा, पंखे तसेच अन्य कामांसाठी २८ लाख २८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
- वैद्यकीय महाविद्यालयात ५० खाटांच्या आयसेलोशन वॉर्डकरीता मेडिकल गॅस पाईपलाईन सीस्टिम कार्यान्वित करण्यासाठी १ कोटी २५ लाख १८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.