इटीपीबीएस व टपाली मतपत्रिका मतमोजणीने होणार प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:32 PM2019-05-21T12:32:24+5:302019-05-21T12:32:53+5:30
मतमोजणीची जय्यत तयारी
जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू असून एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये विविध कामे अंतिम टप्प्यात आहेत.
२३ रोजी सकाळी ८ वाजता जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस सुरूवात होईल. मतमोजणीसाठी दोन्ही ठिकाणी विधानसभा संघ निहाय १४-१४ टेबल लावण्यात येणार असून एकाची वेळी ही प्रक्रिया सुरू राहील. जळगावसाठी मतमोजणीच्या २८ तर रावेरसाठी २४ फेऱ्या होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदार संघ मिळून ७९९२ इटीपीबीएस मतपत्रिका सैनिकांना पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ५०८२ मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. या मतपत्रिकांची अगोदर मतमोजणी होणार आहे. ईटीपीबीएस पद्धतीने पाठविलेल्या मतपत्रिका वैध आहेत की नाही? याची चाचपणी करण्यासाठी ७ ठिकाणी बारकोड लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक ईटीपीबीएस मतपत्रिकेचे ७ वेळा स्कॅनिंग होणार आहे. ही प्रक्रिया तब्बल पाच तास चालेल. जवळपास दुपारी १ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर इव्हीएमवरील मतमोजणीस सुरूवात होईल.
फेऱ्यांनुसार मिळणार आकडेवारी
या प्रक्रियेसाठी जवळपास १८०० कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणीच्या कामकाजात सहभाग घेतील. या नंतरच्या अवघ्या एक ते दीड तासात कल स्पष्ट होईल, असे संकेत आहेत. चार वाजेच्या आत ही मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.