वयाच्या ८० वर्षांनंतरही ज्येष्ठांचा कोरोनावर प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:00+5:302021-06-09T04:21:00+5:30
भुसावळ : कोरोना काळात आपला आत्मविश्वास दांडगा ठेवून व वेळेवर उपचार घेऊन जिल्ह्यातील दोनही लाटेत ८० वर्षांवरील १०५० ...
भुसावळ : कोरोना काळात आपला आत्मविश्वास दांडगा ठेवून व वेळेवर उपचार घेऊन जिल्ह्यातील दोनही लाटेत ८० वर्षांवरील १०५० च्यावर वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून कोरोनाला हरविणे शक्य आहे, असा संदेश कोरोनावर मात केलेल्या वृद्धांनी दिला आहे.
कोरोनाचे लवकर निदान झाल्यास त्यावर मात करणे शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचेही म्हणणे आहे. हा आजार अंगावर काढल्यास त्याचे भयावह परिणाम समोर येतात व तशी अनेक उदाहरणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली आहे. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातात.
पहिल्या व दुसऱ्या लाटेची तुलना केल्यास दुसऱ्या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे व मृत्यू होण्याचे प्रमाण हे वृद्धांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
पहिल्या लाटेत वृद्धांचे मृत्यू अधिक होते किंवा ज्यांना अन्य व्याधी होत्या अशांचे मृत्यू अधिक होते. दुसऱ्या लाटेत मात्र अन्य व्याधी नसलेल्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाला आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही कमी वेळात अधिक रुग्ण व मृत्यू अशी होती. पहिली लाट ही साडेसहा महिने होती, त्यात जेवढे रुग्ण आढळले नाही त्यापेक्षा अधिक रुग्ण दुसऱ्या लाटेत तीन महिन्यात समोर आले. एप्रिल अखेरपासून काहीसे रुग्ण कमी झाले. मे महिना हा दिलासादायक गेला तर जूनमध्ये रुग्णसंख्येचा आलेख घसरल्यानंतर पाॅझिटिव्हिटी कमी झाली. सध्या दोन टक्के पॉझिटिव्हिटी आहे.