कोरोनानंतरही मालवाहतुकीची यंत्रणा अधिक झाली सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:24+5:302020-12-12T04:33:24+5:30
कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात ...
कोरोनामुळे प्रवासी उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यामुळे, एसटी आणि रेल्वेने मालवाहतुकीला सुरुवात केली. रेल्वेची पूर्वीपासूनच मालवाहतूक सेवा असली तरी, कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंचीही मालवाहतूक करून आणखी एक उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे, खासगी मालवाहतुकीची साधने पूर्ववत सुरू होऊनही, एसटी व रेल्वेच्या मालवाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही. उत्पन्नात दिवसागणिक वाढ होऊन मालवाहतूक यंत्रणा अधिकच सक्षम झाली आहे. तसेच दुसरीकडे दळणवळणाचा भाग असलेल्या विमानसेवेने कोरोनानंतर पुन्हा उभारी घेतली असून, विमानतळावरही करोडो रुपयांच्या विकासकामांची पाया भरणी झाली आहे.
कोरोनामुळे राज्यासह देशभरातील दळणवळणाच्या सुविधा पूर्णत: ठप्प झाल्या होत्या. एसटी, रेल्वे व विमानसेवेची प्रवासी सेवा बंद झाल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये एसटी महामंडळाच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठींही पैस नव्हते. परिणामी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला रखडतच राहिले. यावर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी सेवाव्यतिरिक्त लालपरीचे ट्रकमध्ये रूपांतर करून एप्रिलपासून मालवाहतुकीला सुरुवात केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांप्रमाणे एसटीच्या ट्रकमधून व्यापारी व उद्योजकांचा माल पोहोचविण्यात येत आहे. खाजगी मालवाहतुकीपेक्षा महामंडळाचे भाडे कमी असल्यामुळे व्यापारी व उद्योजकांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद असून, जळगाव विभागाने आतापर्यंत मालवाहतुकीत दोन कोटींहून अधिक उत्पन्न मिळविले आहे.
रेल्वे प्रशासनानेही लॉकडाऊनमुळे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्रपणे मालवाहतूक सेवा सुरू केली होती. या रेल्वेने ज्वारी, बाजरी, किराणा माल, फळे आदी जीवनावश्यक वस्तूंसह विविध ठिकाणी औषधांचा साठाही पाठविण्यात आला. रेल्वेेने मालवाहतुकीतून आतापर्यंत ५.६५ दशलक्ष टनाची वाहतूक करीत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
कोरोनानंतरही प्रवाशांच्या प्रतिसादाने विमानाची पुन्हा झेप
कोरोनामुळे एसटी व रेल्वेसह जळगावची विमानसेवाही पूर्णत: ठप्प होती. देश-विदेशातून विमानाने आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळून येत असल्याने, पुन्हा विमानसेवेला प्रवाशी मिळतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, राज्यासह देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची लाट कमी झाल्याने, प्रवाशी विमानसेवेकडे वळले आहेत. परिणामी सध्या सुरू असलेल्या अहमदाबाद - जळगाव व जळगाव - मुंबई विमानसेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभत असून, विमानसेवेने पुन्हा झेप घेतली आहे.
सचिन देव, जळगाव