आर्थिक वर्ष संपले तरी जि.प.कडून अखर्चित निधीची माहिती सादर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:46+5:302021-04-25T04:15:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतील २०१९-२० या वर्षातील अखर्चित निधीची माहिती सादर करण्याविषयी वारंवार कळवूनदेखील तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतील २०१९-२० या वर्षातील अखर्चित निधीची माहिती सादर करण्याविषयी वारंवार कळवूनदेखील तसेच आर्थिक वर्ष संपले तरी ही माहिती सादर न झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ६३ कोटी ४२ लाख रुपयांमधून ३१ मार्चअखेर किती निधी खर्च झाला व किती निधी अखर्चित राहिला याची माहिती तत्काळ सादर करावी, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
जिल्हा वार्षिक योजोअंतर्गत २०१९-२० या वर्षाकरिता जिल्हा परिषदेला ११६ कोटी २४ लाख रुपये निधी देण्यात आला होता. त्यापैकी डिसेंबर २०२० अखेरपर्यंत ५२ कोटी ८२ लाख रुपये खर्च झाला व ६३ कोटी ४२ लाख रुपये निधी शिल्लक राहिला. या शिल्लक निधीविषयी २९ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच त्यानंतर वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकांत हा शिल्लक निधी संपूर्ण खर्च करण्याविषयी जिल्हा परिषदेला सुचविण्यात आले होते. त्यानंतर आता आर्थिक वर्ष संपले असल्याने या ६३ कोटी ४२ लाख रुपयांमधून ३१ मार्च २०२१ अखेर प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला व किती निधी अखर्चित राहिला याबाबत योजनानिहाय माहिती सादर करावी, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.