दोषारोपपत्र दाखल तरीही सुनील झंवर, जितेंद्र कंडारे मोकाटच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:06+5:302021-05-10T04:16:06+5:30
बीएचआर : सहा महिन्यांपासून भागमभाग जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे तर दुसरीकडे ...
बीएचआर : सहा महिन्यांपासून भागमभाग
जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे तर दुसरीकडे गुन्हा दाखल होऊन सहा महिने झाले आहेत. तरी देखील मुख्य संशयित सुनील झंवर व जितेंद्र कंडारे पोलिसांकडे किंवा न्यायालयासमोर हजर झाले नाहीत किंबहुना पोलिसांनीही अटकेची कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांची भागमभाग सुरूच आहे.
बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी २६ नोव्हेंबर रोजी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातील बीएचआर पतसंस्थेचे मुख्य कार्यालयासह, अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह इतरांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापा टाकून कारवाई केली व काहींना अटक केली. या कारवाईपासून म्हणजेच तब्बल सहा महिन्यांपासून या गुन्ह्यातील मुख्य संशयित सुनील झंवर तसेच जितेंद्र कंडारे हे मोकाटच आहेत.
दुसरीकडे दोघा संशयितांच्या फरार घोषित करण्याच्या कार्यवाही सुध्दा कोरोना अन् लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली आहे. झंवर, कंडारे यांना अटक होत नसल्याने विविध चर्चांना उधाण येत असून दोघांना अटक होणार की नाही, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दोन ट्रक पुरावे संकलित
या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात छापे टाकून दोन ट्रक पुरावे संकलित केले आहेत. यात आजपावेतो सुजित सुभाष बाविस्कर उर्फ वाणी, धरम किशोर साखला, महावीर मानकचंद जैन, विवेक देवीदास ठाकरे, कमलाकर कोळी, सूरज सुनील झंवर या संशयितांना अटक करण्यात आली आहे. कमलाकर वगळता सर्व संशयित सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतच्या तपासात संकलित पुरावे तसेच चौकशी अंती २३ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पुणे येथील न्यायालयात संशयित सूरज झंवर, सुजित वाणी, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे, कमलाकर कोळी यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.