लक्ष्मीपूजनानंतरही सुवर्णनगरीत खरेदीचा उत्साह अजूनही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:15 AM2021-11-14T07:15:42+5:302021-11-14T07:15:54+5:30
सोने पुन्हा ५० हजारांवर; नवरात्रोत्सवापासून मिळाली झळाळी
जळगाव : दिवाळीतील सर्व मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाल्यानंतर अजूनही सुवर्णनगरी जळगावात सोन्याच्या खरेदीसाठी गर्दी कायम आहे. सोन्याचे भाव प्रति तोळा पुन्हा ५० हजारावर पोहोचले असले तरी जोरदार खरेदी सुरू आहे. ग्राहकांच्या उत्साहामुळे दररोज सुवर्णपेढ्यांमध्ये मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.
सोेने खरेदीला नवरात्रोत्सवापासून झळाळी मिळाली. दिवाळीत १७५ सुवर्णपेढ्यांमध्ये सुमारे ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. आता लक्ष्मीपूजन होऊन १० दिवस उलटले तरी खरेदीचा उत्साह अजूनही कायम आहे.
भाऊबीजेला सोन्याचे भाव ४९ हजार रुपये प्रति तोळा तर चांदीचे भाव ६७ हजार रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत. चांदीच्याही भावात वाढ होऊन ६८ हजारांवर पोहोचली आहे. सुवर्ण बाजारात अजून आठ दिवस गर्दी कायम राहणार आहे. माहेरवाशिनी येथे आल्यानंतर वर्षभरातील केलेल्या बचतीतून सोने खरेदी करतात.
यंदा सुवर्ण खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. दिवाळीतील सर्व मुहूर्तावर दररोज खरेदीसाठी गर्दी होती. ही गर्दी अजूनही कायम असून ती आठवडाभर राहू शकते.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक