झाड छाटण्याचे आदेश असतानाही मूळासकट तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:03 PM2018-07-20T23:03:44+5:302018-07-20T23:04:26+5:30
अमळनेरच्या विश्रामगृहातील प्रकार : कारवाईची मागणी
अमळनेर, जि.जळगाव : जिल्हा परिषदेच्या येथील विश्रामगृहाच्या आवारातील निंबाचे झाड छाटण्याचे आदेश असताना ते झाड मूळापासून तोडण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांनी याबाबत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता गणेश गवळी यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शासन आदेश असताना १ जुलैपासून आतापर्यंत येथे विश्रामगृहाच्या मोठ्या आवारात एकही वृक्ष लावण्यात आलेला नाहीत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी अभियंता गवळी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विनोद जाधव यांनी केली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात धुळे रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. विश्रामगृहाच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. त्यापैकीच एक निंबाचे झाड होते. या झाडा शेजारून विद्युत तार गेल्याने पंचायत समितीने पालिकेला पत्र देऊन हे झाड छाटण्याची परवानगी मागितली होती. पालिकेने ती परवानगी १८ मे रोजी दिली होती, मात्र तब्बल दोन महिन्यांनंतर १८ जुलै रोजी झाड छाटण्याऐवजी मूळापासून तोडण्यात आले. याबाबत पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांनी अभियंता गवळी यांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
१ ते १३ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण करण्याचे शासन आदेश होते. असे आदेश असताना विश्रामगृहाच्या आवारात एकही वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. मात्र जे निंबाचे झाड होते तेदेखील तोडण्यात आल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अभियंता गवळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदर झाड तोडण्याची पारोळा वनविभागाकडे परवानगी मागितली आहे, मात्र ती अद्याप मिळालेली नाही, ती मिळाली की मूल्यांकन करून त्या झाडाचा लिलाव केला जाईल, असे सांगितले. पारोळा वनविभागाशी संपर्क केला असता वनाधिकारी दशहरे यांनी सांगितले की, सदर झाड पालिका क्षेत्रात येते. त्यामुळे ते तोडण्याची अथवा छाटण्याची परवानगी पालिकेचे वृक्ष अधिकारी देतात.
विश्रामगृहात वृक्षारोपण न करता वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत कनिष्ठ अभियंता गवळी यांना विचारणा केली, मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देतात. विनापरवानगी झाड तोडल्याने संबंधितावर कारवाई कराव.
-विनोद जाधव, सदस्य, पंचायत समिती, अमळनेर