दहा वर्षांपूर्वी ११ लाख घेऊनही शेतजमीन खरेदीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:07+5:302021-06-10T04:13:07+5:30
भाव वाढल्याने फिरली नियत : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव : जळू, ता. एरंडोल शिवारातील शेतजमीन खरेदीसाठी दहा वर्षांपूर्वी ११ ...
भाव वाढल्याने फिरली नियत : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : जळू, ता. एरंडोल शिवारातील शेतजमीन खरेदीसाठी दहा वर्षांपूर्वी ११ लाख रुपये घेऊनदेखील व या जमिनीवर मॅनेजर मामलेदार एरंडोल यांचे नाव कमी करून जमीन स्वस्तात खरेदी करून देण्याचे आश्वासन देऊनही ती खरेदी न करून दिल्याने रमेश काळू चौधरी (वय ३५, रा. नित्यानंदनगर) या तरुणाची फसवणूक झाली असून, याप्रकरणी विनायक भालचंद्र ठाकूर (रा. एरंडोल) व पांडुरंग दगा पाटील (रा.चोपडा) या दोघांविरुद्ध बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या भागात शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने या दोघांची नियत फिरली, त्यामुळेच त्यांनी ही जमीन खरेदी करून देण्यास नकार दिल्याचे तक्रारदार रमेश चौधरी यांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील जळू शिवारात गट नंबर २४६ येथील शेतजमीन चौधरी यांना खरेदी करायची होती. या जमिनीवर मॅनेजर मामलेदार एरंडोल यांचे नाव होते. जमिनीचे मूळ मालक पांडुरंग दगा पाटील हे आहेत. यासंदर्भात पाटील यांनी मामलेदार यांच्याकडे अर्ज करून जमिनीच्या उताऱ्यावर स्वत:चे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू केली होती, तसेच ही जमीन चौधरी यांना विक्री करण्यासाठी २४ नोव्हेंबर २०११ रोजी करारनामा, बेचनपावती करण्यात आली होती. यावेळी पाटील यांच्या सांगण्यावरून विनायक भालचंद्र ठाकूर यांना बयाणा म्हणून तीन लाख रुपये चौधरी यांनी दिले. हा व्यवहार चौधरी यांच्या घरी व भास्कर मार्केटमधील दुकान क्रमांक २५ येथे झाला होता. दरम्यान, प्राथमिक व्यवहार झाल्यानंतर पाटील व ठाकूर यांनी वेगवेगळे कारण सांगून चौधरी यांच्याकडून एकूण ११ लाख रुपये घेतले; परंतु जमीन त्यांच्या नावावर करून दिली नव्हती. १९ ऑगस्ट २०१९ रोजी पाटील यांनी उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे अर्ज करून उताऱ्यावर नाव लावण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य केल्यानंतर उताऱ्यावर पाटील यांचे नाव लागले. तरीदेखील त्यांनी चौधरींच्या नावे जमीन केली नाही. आपली फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर ८ ऑक्टोबर २०२० रोजी चौधरी यांनी वकिलामार्फत दोघांना नोटीस दिली; परंतु ठाकूर यांनी नोटीस स्वीकारली नाही.
भाव वाढल्याने जादा पैशांची मागणी
रमेश चौधरी यांनी या व्यवहारासाठी ११ लाख रुपये दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जमीन खरेदी करून देण्याबाबत वारंवार विनंती केली; परंतु आता जमिनीची किंमत वाढलेली असल्यामुळे दोघांनी त्यांच्याकडे ज्यादा पैशांची मागणी केली आहे. यासंदर्भात चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील व ठाकूर यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.