तीन महिन्यांनंतरही भुसावळ-पुणे एक्सप्रेस दौंडपर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:16 AM2021-08-01T04:16:55+5:302021-08-01T04:16:55+5:30
जळगाव : कोरोनाकाळात भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ ते पुणेदरम्यान सुरू केलेली विशेष गाडी अचानक २७ मे ...
जळगाव : कोरोनाकाळात भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ ते पुणेदरम्यान सुरू केलेली विशेष गाडी अचानक २७ मे पासून ते २९ जुलैपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर, आता २९ जुलै उलटूनही रेल्वे प्रशासनातर्फे पुन्हा ही गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अधिकच गैरसोय होत असून, ही गाडी दौंडपर्यंत का? असा प्रश्न संतप्त प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
दुसऱ्या लाटेनंतर शासनाने अनलॉक केल्यानंतरही भुसावळ रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे कारण सांगूून, दीड वर्षानंतरही एकही पॅसेंजर सेवा सुरू केलेली नाही. मात्र, गाड्या सुरू करण्याबाबत प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरू न करता, भुसावळ ते पुणेदरम्यान विशेष गाडी सुरू केली होती. विशेष म्हणजे सुरुवातीला आठवड्यातून एकदा व टप्प्या-टप्प्याने नियमित ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवस अशा प्रकारे सेवा सुरू राहिल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारण सांगून अचानक २७ मे २०२१ पासून ही गाडी पुण्यापर्यंत न सोडता २९ जुलैपर्यंत दौंडपर्यंतच धावणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता २९ जुलैनंतरही ही गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत दौंडपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धिपत्रक काढल्यामुळे प्रवाशांमधून रेल्वेच्या कारभारावर तीव्र संपात व्यक्त होत आहे.
इन्फो :
...तर आताही आठवड्यातून एकदाच सेवा :
रेल्वे प्रशासनाने सुरुवातीला भुसावळ ते पुणे ही गाडी आठवड्यातून एकदा आणि टप्प्या-टप्प्याने दररोज धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, अनेक महिन्यांनंतरही ही गाडी आठवड्यातून एकदा आणि तीदेखील पुणेऐवजी दौंडपर्यंत सोडण्यात येणार असल्यामुळे, प्रवाशांची ही गाडी सोयीची नसून, गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे ही नियमित आणि पुण्यापर्यंत सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान, सध्या दौंडपर्यंतच ही गाडी धावत असल्याबद्दल, भुसावळ जनसंपर्क विभागाशी `लोकमत` प्रतिनिधीने संपर्क साधला असता, त्यांनी दौंडहून पुढे पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असल्याचे सांगितले.