दिवाळीच्या तीन आठवड्यानंतरही किराणा साहित्याला मागणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:49+5:302020-12-07T04:10:49+5:30
जळगाव : दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा माल खरेदीला फारसा उठाव नसल्याने खाद्य ...
जळगाव : दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा माल खरेदीला फारसा उठाव नसल्याने खाद्य तेलासह सर्वच किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. भाजीपालादेखील सलग तिसऱ्या आठवड्यातही स्थिर असून कांदा, बटाट्याचे भाव काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा आहे.
दरवर्षी दिवाळीनंतर साधारण १५ दिवस किराणा साहित्याची फारसी उलाढाल नसते. अनेक जण बाहेरगावी गेल्याने हा परिणाम जाणवतो. मात्र यंदा दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी अद्यापही किराणा साहित्याला हवा तसा उठाव नसल्याचे विक्रेत्यांचे या आठवड्यातही बहुतांश वस्तूंचे भाव स्थिर आहेत.
यामध्ये शेंगदाणे ११५ ते १२५ रुपये, साबुदाणा ६८ ते ७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. या सोबतच साखर ३७ ते ३८ रुपये प्रति किलोवर तर रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये, बेसणपीठ ८० ते ८५ रुपये, वनस्पती तुपाचे भावदेखील १०० ते ११० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
खाद्य तेलाचे भाव कमी होईना
दिवाळीच्या अगोदरपासून भाव वाढ झालेल्या खाद्य तेलाचे भाव अजूनही वाढलेलेच आहे. घरगुती फारसी मागणी नसली तरी खाद्य पदार्थ व्यावसायिकांकडून मागणी असल्याने खाद्य तेलाचे भाव अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन तेल ११८ ते १२० रुपयांवर कायम आहे.
बाजारात गाजर दाखल
फळ बाजारामध्ये पेरुचे भाव कमीच असून २० रुपये प्रति किलोवर आले आहे. बाजारात गाजर दाखल झाले असून ३५ ते ४० रुपये प्रति किलोने ते विक्री होत आहे.
बटाटे ४० रुपयांवर
भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहे. कांदा-बटाट्याचे भाव मात्र कमी झाले आहे. यामध्ये नवीन बटाटे दाखल झाले असून ते ४० ते ४५ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. जुने बटाटे ६० रुपयांवरून ५० रुपयांवर आले आहे. कांद्याचे भाव ६० ते ७० रुपयांवरून ५० रुपयांवर आले आहे.
भाजीपाल्याचे भाव स्थिर राहण्यासह कांदा, बटाट्याचे भाव कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. किराणा साहित्याचे दर स्थिर असल्याने दिलासा आहे.
- राजेंद्र महाजन, ग्राहक
दिवाळी होऊन तीन आठवडे होत आले तरी यंदा किराणा साहित्याला मागणी वाढलेली नाही. त्यामुळे तेलासह जवळपास सर्वच वस्तूंचे भाव अजूनही स्थिर आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
कांदा, बटाट्याचे भाव