पूर ओसरेलही, अश्रूंना बांध कसे घालायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:41+5:302021-09-02T04:34:41+5:30
चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या ...
चाळीसगाव : ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ असं म्हणत प्रशासनासह सर्वच गाफील राहिल्यास काय दाणादाण उडते. हे बुधवारी पहाटे चाळीसगावच्या डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराने सहप्रमाण सिद्ध केले आहे. यशाचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच चढाओढ असते; मात्र अपयशाला खांदा द्यायला कुणीही तयार नसतो. त्यामुळे आपत्तीचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी अगामी काळात स्पर्धाही सुरु होईल.
संकटे ही नैसर्गिक असली तरी मानवी हस्तक्षेपांमुळे ती जीवघेणीही ठरत आहेत. चाळीसगावी डोंगरी व तितूर नदीला आलेल्या पुराला मानवी हस्तक्षेपाचाही लोंढा आहेच. हे नाकारता येत नाही. पूर ओसरेलही पण ज्यांचे सर्वस्व पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांच्या अश्रूंना बांध कसा घालायचा ? हा प्रश्न मन सुन्न करुन टाकतो. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनासह आमदार मंगेश चव्हाण हे रस्त्यावर उतरुन नागरिकांना धीर देताना दिसून आले.
शहरात दत्तवाडी भागात डोंगरी व तितूर नदीचा संगम होऊन पुढे तितूर नदी वाहत जाते. या परिसरात शिवाजी घाट, भाजी मंडईसह मोठी नागरी रहिवास आहे.
गेल्या काही वर्षांत नदीची पावसाळ्यापूर्वी होणारी मशागत येथे झालेली नाही. नदी खोलीकरण, गाळ उपसा, स्वच्छता याबाबत आनंदीआनंद आहे. पालिका प्रशासन तर ही आमची जबाबदारीच नाही अशा भूमिकेत दिसते. सूर्यनारायण मंदिरालगत नदी सुशोभीकरणासाठी मध्यंतरी दगडांचे मोठे भराव टाकून एक लोखंडी पूल उभारण्यात आला; मात्र या पुलाला दोन्ही बाजूने प्रवेशासाठी जागाच नसल्याने हेच का ते सुशोभीकरण? असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.
दगडांचा भराव केल्याने पाण्याचा जोर वाढल्याने पुराचे पाणी थेट पूर्णपात्रे हाॅस्पिटलसह तहसील कार्यालयजवळील वीर सावरकर चौकांपर्यंत पोहोचले होते. स्टेशन रोडलगतच्या गल्ल्यांमध्येही ते घुसले. येथे दुचाकी व चारचाकी वाहने जलमय झाली होती.
दुसरा मुद्दा नदीतील अतिक्रमणाचा आहे. नदीचे बहुतांशी पात्र अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. खरजई रोडलगतच्या वीटभट्ट्या असोत की भाजी मंडई लगतच्या दुकानांची अतिक्रमणे. नदीच्या मूळ नैसर्गिक प्रवाहाला बाधा निर्माण झाली आहे. साहजिकच बुधवारी आलेल्या पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये घुसून हाहाकार उडाला. नव्या व जुन्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने उर्वरित शहराचा संपर्क तुटला. वीजपुरवठा खंडित झाला. पावसाळ्यापूर्वी पूररेषा नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देणे, ही पालिका प्रशासनाची कामे आहेत. मात्र हे सर्व कागदावरच राहिले, असा संतप्त सूर बुधवारी दिवसभर व्यक्त होत होता.
तितूर नदी हिरापूर रस्त्यालगत तळेगावकडून वाहत येते. या नदीत ठिकठिकाणी सांडपाणी सोडल्याने तितूरची केव्हाच गटारगंगा झाली आहे. तितूरची जशी कोंडी झाली आहे. तशीच स्थिती पाटणादेवीच्या धवलतीर्थ डोहातून उगम पावलेल्या डोंगरीचीही झाली आहे. या नदीचा शहरात प्रवेश बामोशी बाबांच्या दर्गाहाला स्पर्श करुन होतो. बाबांच्या दर्गाहात वर्षभर भाविकांचा राबता असल्याने नदीपात्रातच फुले, शिरणी, पूजा साहित्याची दुकाने थाटलेली असतात. परगावाहून आलेले भाविक येथे नदीपात्रातच झोपड्या उभारुन राहतात. पुढे रिंगरोडलाही नदीपात्रालगत ठिकठिकाणी रहिवाशांनी अतिक्रमणे केली आहेत. दोन्ही बाजूने नदीपात्रे आकसल्याने बुधवारी आलेल्या पुराच्या पाण्याने थेट १० ते १५ फूट उंचीवर असलेल्या बामोशी बाबांच्या समाधीपर्यंत धडक दिली. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. पुराचे पाणी घाटरोडपर्यंत शिरले होते. याच पुरात दुकानदारांचे साहित्य तर नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू, जनावरे वाहून गेली. पूर ओसरल्यानंतर आता पूरग्रस्तांचे डोळे वाहू लागले आहेत. यातून काही बोध घेतला तर ‘देर आये दुरुस्त आये’, असे होईल. नाही तर आहेच ‘नेमेचि येतो मग पावसाळा.’