सर्वसामान्य नागरीकही विचारताय शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांबाबत प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 07:38 PM2017-12-31T19:38:33+5:302017-12-31T19:39:57+5:30
समांतर रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारणारे अशोक पाटील आंदोलनाचे ‘ब्रॅड अॅम्बेसॅडर’
जळगाव: महात्मा गांधी उद्यानातील भेटीप्रसंगी दररोज जीव जातायं...समांतर रस्ते कधी करणार? असा निर्भिडपणे थेट पालकमंत्र्यांना प्रश्न मांडणाºया अशोक पाटील यांचा रविवारी समांतर रस्ते कृती समितीतर्फे सत्कार करण्यात आला व त्यांना कृती समितीच्या आंदोलनाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ घोषीत करण्यात आले.
महात्मा गांधी उद्यानातील भेटीप्रसंगी पालकमंत्र्यांनी स्वत:हून तेथे व्यायाम करीत असलेल्या अशोक पाटील (७२) यांच्याशी संवाद साधताच त्यांनी ‘समांतर रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. सर्वसामान्य नागरिकही आता थेट मंत्र्यांना या गंभीर विषयावर प्रश्न करीत असताना पालकमंत्रीपद सांभाळत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना मात्र शहरातील शेकडो लोकांचे बळी घेणाºया या समांतर रस्त्यांचा गंभीर विषयच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समातंर रस्त्यांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने नाईलाजाने महामार्गावरूनच ये-जा करावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही झाली, मात्र दरवेळी आता कामाला सुरूवात होईल, असे आ श्वासन देऊन वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीने ‘नही’कडे प्राप्त झालेल्या १०० कोटींच्या निधीतून तातडीने या समांतर रस्त्यांच्या कामास सुरूवात व्हावी. केवळ आश्वासने न देता तातडीने कामास सुरूवात व्हावी, या मागणीसाठी १० जानेवारी रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. तसेच याबाबत शनिवारी पालकमंत्र्यांची वेळ मिळाल्यास त्यांच्याशीही चर्चा करण्याची समितीची तयारी होती. मात्र पालकमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे समितीची चर्चा होऊ शकली नाही. मात्र गांधी उद्यानात ७२ वर्षीय अशोक पाटील यांनी पालकमंत्र्यांनी विचारपूस करताच स्वत:बद्दल किंवा नातलगांचे विषय न मांडता येथ सार्वजनिक हिताचा समांतर रस्त्यांचा विषय पालकमंत्र्यांना विचारला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये या विषयावर गांभीर्याने चर्चा होत असल्याचे व मंत्री, लोकप्रतिनिधी मात्र या विषयाबाबत गंभीर नसल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.
गंभीर विषयाबाबत पालकमंत्री अनभिज्ञ
गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून पालकमंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याचा कारभार पाहणाºया पालकमंत्र्यांना दररोज निरपराध नागरिकांचे बळी घेणाºया महामार्ग व समांतर रस्त्यांचा गंभीर विषयच माहित नव्हता, हे गांधी उद्यानातील प्रसंगामुळे स्पष्ट झाले आहे. जेव्हा उद्यानात अशोक पाटील यांनी जाता-जाता पालकमंत्र्यांना समांतर रस्त्यांचे पहा अशी विनंती केली, तेव्हा पालकमंत्र्यांना क्षणभर हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचाच मुद्दा असावा, असा समज होऊन त्यांनी पाटील रागाने तुम्ही कर भरता का? म्हणून विचारणा केली. मात्र नंतर अशोक पाटील यांनी विषय पूर्ण सांगितला तेव्हा जिल्हाधिकाºयांकडून त्यांना हा विषय समजावून घ्यावा लागला. त्यानंतर १०० कोटीच्या निधीतून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
निधी खर्च करण्यासाठी निवडणुकीचा मुहूर्त?
समांतर रस्त्यांचा प्रश्न हा जळगाव शहरातील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. जळगाव मनपाची सत्ता मात्र खाविआकडे आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती नसल्याने मनपाने हे समांतर रस्ते करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले असून याबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री तसेच मंत्र्यांना वेळोवेळी निवेदनेही दिली आहेत. मात्र राज्यात, केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाला मनपावरही ‘शत प्रतिशत भाजपा’ची सत्ता आणावयाची असल्याने ज्याप्रमाणे २५ कोटींच्या निधीच्या कामात सातत्याने खोडा घातला जात आहे, त्याचप्रमाणे या समांतर रस्त्यांच्या कामाचाही खेळखंडोबा करावयाचा आहे का? अशी विचारणाही आता नागरिकांकडून केली जात आहे.
‘लोकमत’ वृत्ताची चर्चा
सर्वसामान्य नागरिकाने अचानकपणे भेट झालेल्या पालकमंत्र्यांनाच समांतर रस्त्याचा प्रश्न विचारल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या रविवार, ३१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दिवसभर चर्चा होती. सोशलमिडियावरही या विषयाची चर्चा होती. तसेच पालकमंत्र्यांनी विचारलेल्या ‘कर भरता का?’ या खोचक प्र श्नाबाबत नाराजीही व्यक्त होताना दिसत होती.
समितीकडून अशोक पाटील यांचा सत्कार
समांतर रस्ते कृती समितीतर्फे रविवारी सायंकाळी कांताई सभागृहात अशोक पाटील यांचा सार्वजनिक हिताचा हा प्रश्न थेट मंत्र्यांना विचारल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विनोद देशमुख, गजानन मालपुरे, फारूख शेख, अरविंद देशपांडे, विराज कावडिया, दिलीप तिवारी, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.