अर्ध्यावरती डाव मोडला जरी पूर्ण केली कहाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:36 PM2020-10-24T14:36:53+5:302020-10-24T14:37:22+5:30
मी नवदुर्गा- सरलाबाई चौधरी
नाव : सरलाबाई मोतीलाल चौधरी
व्यवसाय : चाळीसगाव पोस्ट कार्यालयात मेल वितरक
नोंद घेण्यासारखे कार्य :
पती निधनानंतर नोकरी स्वीकारली
पाच मुलींचे विवाह केले एकटीने
बसस्थानकात दरदिवशी सात तास थांबून टपाल पिशव्यांची करतात पोहच
आजारावर माती करीत ओढला संसाराचा गाडा
अल्प शिक्षित असूनही मुलींना शिकवले
चाळीसगाव बसस्थानकावर दरदिवशी 'तिची' लगबग सुरुच असते. बसमध्ये टपाल पिशव्यांची पोहच करण्याचे काम ती करते. दुपारी एकपर्यंत तिची धावपळ सुरुच असते. तिच्या याच धावपळीने संसाराला आधार मिळाला. पतीच्या निधनानंतर अर्ध्यावरती मोडलेला डाव तिने जिद्दीने पुढे रेटला. कष्टक-यांमधील नवदुर्गा म्हणून सरलाबाई मोतीलाल चौधरी वेगळ्या ठरतात. गेल्या १४ वर्षापासून त्या एकाकी परिस्थितीशी सामना करीत आहे. पतीच्या निधनाचा घाव पचवून त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसत पदर खोचला. पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण करीत हातही पिवळे केले. 'कुटूंबकर्ती' म्हणूनही सरलाबाई इतरांच्या मनपटलावर प्रेरणेची माळच फुलवतात.
सरलाबाई यांचे पती हे चाळीसगाव पोस्ट कार्यालयात नोकरीस होते. २००६ मध्ये त्यांचे निधन झाले. भरल्या संसारात असा अंधार दाटल्यानंतर अल्पशिक्षित सरलाबाई काही काळ कोलमडल्या. तथापि पाच मुलींचे गोंडस चेहरे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरीची संधी मिळाली. २००८ मध्ये मोठ्या जिद्दीने त्या पोस्ट सेवेत रुजू झाल्या. गेल्या १४ वर्षात खचून न जाता संसाराचा गाडा ओढला. संघर्षाच्या १४ वर्षात त्यांनी पाचही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे हातही पिवळे करुन दिले. पाचही मुली त्यांच्या सुखी संसारात रमून गेल्या आहेत.
सरलाबाईंनी बेलगंगा पोस्ट कार्यालयात सेवेला सुरुवात केली. गेल्या नऊ वर्षापासून त्या चाळीसगाव कापड गिरणी पोस्ट कार्यालयात मेल वितरक म्हणून काम करीत आहे. बसस्थानकात टपाल पिशव्यांची बसमध्ये पोहच करण्याची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली आहे. सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत त्यांची बसस्थानकात धावधाव सुरू असते. कठीण परिस्थितीत दुःखाला कवटाळत न बसता सरलाबाई संकटांना भिडल्या. आर्थिक संकटेही त्यांनी पेलली. मात्र आयुष्यावर 'शतदा प्रेम' करावे, असं म्हणत त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मध्यंतरी आजारानेदेखील या दुर्गेची परीक्षा घेतली. यातही सरलाबाईंनी नेटाने आजाराला परतवून लावले. कर्म ही पूजा केली की, परमेश्वर मदतीसाठी धावून येतोच, असं मोठ्या आत्मविश्वासाने त्या सांगून जातात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव उजळून निघतात.