माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:25+5:302021-07-16T04:13:25+5:30
जळगाव : प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दल विलक्षण ओढ असते. दीड वर्षापासून मात्र कोरोनाने सासुरवाशिनीची वाट अडविली आहे. कोरोनामुळे कोणत्याही ...
जळगाव : प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दल विलक्षण ओढ असते. दीड वर्षापासून मात्र कोरोनाने सासुरवाशिनीची वाट अडविली आहे. कोरोनामुळे कोणत्याही महिलेला माहेरी येता आले नाही. आषाढ महिन्यात ठिकठिकाणी रथोत्सव असतो, यानिमित्ताने सासुरवाशिणी माहेरी येतात. त्याशिवाय कानुबाई यांचा उत्सवही याच कालखंडात असतो.
खान्देशात अक्षय्य तृतीया अर्थात आखाची हा महत्त्वाचा मानला जातो. अक्षय्य तृतीया व दिवाळी या काळात सासुरवाशिणी महिना, पंधरा दिवसांसाठी माहेरी येते. आषाढीत दोन-चार दिवसांसाठी येते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आदी उत्सव या महिन्यात असतात. आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी आपल्या माहेरी येत असली तरी यंदा त्यात खंड पडला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारीसाठी सासरचे लोक नवविवाहितेला माहेरी पाठवत नाहीत. वृध्द तसेच दमा, मधुमेह व इतर आजार असलेल्यांना अधिक धोका असल्यामुळे उगाच जोखीम पत्करायला कुणी तयार नाही. कोरोनामुळेच यंदा आषाढीला माहेरी जाता आले नसल्याचे सीमा विजयसिंग पाटील या विवाहितेने सांगितले.
आषाढीचा रथोत्सव हा लोकोत्सव असल्याने मोठी गर्दी होते. यानिमित्ताने सर्वच सासुरवाशिणी माहेरी येत असल्याने मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात. नवविवाहिताच नाही तर अगदी वयस्कर व वृध्द महिलादेखील यानिमित्ताने माहेरी येतात. पिंप्राळ्यात रथोत्सव मोठा असल्याने शक्यतो येथील विवाहिता माहेरी जात नाही, ज्यांच्या मुलींचे लग्न झाले आहे, त्याच येथे येतात. यंदा मात्र सर्वच ठिकाणी कोरोनाने वाट अडविली आहे.
कोरोना काळात विवाहांची नोंद
२०२० -२२३
२०२१ (१५जुलैपर्यंत) -१२३
नवविवाहिता म्हणतात..
दीड वर्षापासून सासरीच
कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून माहेरी जायला संधीच मिळाली नाही. सासरच्या मंडळींनीदेखील धोका नको म्हणून परवानगी दिली नाही. माहेरची ओढ असली तरी मोबाइलवर बोलणे होते. कधी व्हिडीओकॉल होतो. यंदाही जाणे शक्य नाही. कोरोनाचा संसर्ग नसला तर दिवाळीत भाऊबीजेला जाता येईल, नाही तर तेव्हाही शक्य नाही.
- मोनिका सुनील पाटील
कोरोनामुळेच ब्रेक
कोरोनामुळेच माहेरी जाता येत नाही. मुले लहान असल्याने उगाचच धोका नको. माहेरी गेल्यावर इतर नातेवाईक व मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. गावातच विठ्ठल-रुख्माईचे मंदिर असल्याने यंदा माहेरी जाणार नाही. सुखदु:खाच्यावेळीदेखील कोरोनामुळे आता मर्यादा यायला लागल्या आहेत.
- कोमल विनोद पाटील
नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात..
रेल्वेगाड्यांची अडचण
कोरोनामुळे मर्यादितच रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यामुळे आरक्षण मिळायलाही अडचणी येत आहेत. दोन वर्षांपासून मुलीची भेट नाही. तिला माहेरी येता येत नाही व मलाही तिच्याकडे जाता येत नाही. आषाढीच काय तर इतर सण, उत्सव व सुखदु:खाच्यावेळीदेखील आम्हा मायलेकींना एकमेकीजवळ जाता आले नाही. कोरोनाने अनेक अडचणी निर्माण केलेल्या आहेत.
- उषा संजय चव्हाण
घराला घरपण
मुलगी माहेरी आली की घराला कसे घरपण येते. घर भरलेले व आनंदाचे वातावरण असते. आषाढीला मुलीने यावे यासाठी आम्ही विनंती केली, मात्र कोरोनामुळेच सासरच्यांनी नकार दिला. तिला लहान बाळ असल्याने आम्ही पण जास्त सक्ती केली नाही. फोनवर बोलणे व व्हिडीओकॉल करून प्रत्यक्ष संवाद होत असल्याने त्यात आनंद मानते.
- रेखा राजेंद्र पाटील