लस घेतली तरी तीन नियम, जबाबदारीची जाणीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:06+5:302021-02-06T04:28:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना लस घेतली असली तरी मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लस घेतली असली तरी मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या तीन नियमांची व जबाबदारीची आपल्याला जाणीव असल्याचे सांगत लस घेतलेल्या प्रत्येकाने या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजत राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी लस घेतली.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे सकाळी ११ च्या सुमारास लस घ्यायला जीएमसीत पोहचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आले. नियमाप्रमाणे कागदपत्र प्रमाणित करून ११.११ वा. जिल्हाधिकाऱ्यांनी लस घेतली व अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबले. यानंतर ११.१५ वाजता पोलीस अधीक्षकांनी लस घेतली. त्यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्रत्येकी अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबले, कोणालाही रिॲक्शन आली नव्हती. डॉक्टरांच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी परतले.
अधिकारी काय म्हणाले
ज्या लसीकरणाची आपण आतुरतेने वाट पाहत होते. ते अखेर सुरू झाले असून महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना लस देण्याचा टप्पा सुरू झाला आहे. यात आपणही लस घेतली आहे. मात्र आपल्याला जबाबदारी जाणीव असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यावेळी म्हणाले. तर पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या लसीकरणाच्या टप्प्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी व आपण स्वत: आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी लस घेऊन केला आहे. गैरसमजांना बाजूला ठेवून लस घ्या, लक्षणे येणे हे लस चांगली काम करीत असल्याचे लक्षण असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे म्हणाले.
दुपारी गर्दी, गोंधळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुपारी दीड वाजेच्या सुमारास आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, विद्यार्थी यांच्यासह पोलीस व महसूलचे कर्मचारी असे एकत्रित लसीकरण सुरू होते. विलंब होत असल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांना अखेर प्रतीक्षालयात न थांबता उभे राहून मोठी रांग लावली होती. यामुळे जीएमसीत दुपारी गर्दी झाली होती. यामुळे लसीकरण होत असलेल्या कक्ष आतून बंद करण्यात आला होता. शिवाय आत एक आणि बाहेर एक अशा दोन ठिकाणी ॲप सुरू करून कागदपत्रे प्रमाणित केली जात होती.