लाॅकडाऊनमध्येही मद्यपींनी रिचविले दोन कोटी लिटर मद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:00+5:302021-05-20T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुनील पाटील जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले होते, या काळात मद्यविक्री करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुनील पाटील
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन लागू केले होते, या काळात मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना बंदच होत्या. मात्र, जेव्हा सुरू झाल्या त्या काळात मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या काळात मद्यपींनी तब्बल १ कोटी ८९ लाख ७६ हजार १४८ लिटर मद्य रिचविले आहे. त्यात सर्वाधिक पसंती देशी दारूला राहिली आहे. बीअरच्या विक्रीत १० टक्के घट झाली, तर वाइनच्या विक्रीत ४१.८४ टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, मद्यविक्री दोन कोटी लिटरच्या घरात असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूणच मद्य विक्रीत घट झालेली आहे. त्याचा परिणाम महसुलावर झालेला आहे. लाॅकडाऊनमध्ये मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. काही महिन्यांनंतर अटीशर्ती व वेळेचे निर्बंध घालून मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली होती. यंदाही तशीच परिस्थिती आहे.
२०१९-२० या आर्थिक वर्षात १ कोटी १३ लाख ८७ हजार २३० लिटर देशी मद्याची विक्री झाली होती, तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी २ लाख ६ हजार २१ लिटर मद्याची विक्री झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.४२ टक्के देशी मद्यविक्री घट झालेली आहे. विदेशी मद्य विक्रीत ४.२८ टक्के घट झाली आहे. २०१९-२० या वर्षात ४५ लाख ४१ हजार ४५५ लिटर विदेशी मद्य विक्री झाली होती, तर मागील वर्षभरात ४३ लाख ४७ हजार ३०३ लिटर मद्य विक्री झाली.
बीअरमध्येही ९.९० टक्के घट झाली आहे. आधीच्या वर्षी ४८ लाख ३६ हजार ६७३ लिटर बीअर मद्यपींनी रिचविली होती, तर मागील वर्षभरात ४३ लाख ५७ हजार ९६८ लिटर बीअर रिचविली. वाइनमध्ये मात्र वाढ झाली आहे. २०२० या वर्षात ४९ हजार ५३३ लिटर वाइन रिचविण्यात आली होती, तर मागील वर्षभरात ७० हजार २५६ लिटर वाइनची विक्री झाली.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर घरपोच मद्य सेवा
मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून शासन नियम डावलून दुकानांमधून सर्रास विक्री सुरू केली होती, तर काही ठिकाणी दुकानाच्या बाहेरच मद्यप्राशन केले जात होते. याबाबत ‘लोकमत’ने फोटोसह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्री करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे ही मद्यविक्री थांबली. आता ग्राहकाला घरपोच सेवा पुरवली जात आहे,
अशी आहे मद्यविक्री (लिटरमध्ये)
देशी मद्य : १,०२,००,६२१
विदेशी मद्य : ४३,४७,३०३
बीअर : ४३,५७,९६८
वाइन : ७०,२५६
एकूण : १,८९,७६,१४८