नवीन आदेशातही व्यापारी संकुलांचे ‘लॉक’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:25 PM2020-07-14T12:25:38+5:302020-07-14T12:27:44+5:30

मुख्य बाजारपेठेत वाहनांना बंदी : वाढीव तासासह आजपासून व्यवहार

Even in the new order, the 'lock' of merchant packages remains | नवीन आदेशातही व्यापारी संकुलांचे ‘लॉक’ कायम

नवीन आदेशातही व्यापारी संकुलांचे ‘लॉक’ कायम

Next

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले ‘जनता लॉकडाऊन’ हटवून काही निर्बंधांसह १४ जुलैपासून व्यवहार सुरू आहे. यामध्ये जळगाव शहरात लॉकडाऊनपूर्वीचेच जवळपास बहुतांश आदेश लागू राहणार असले तरी या आदेशातदेखील शहरातील व्यापारी संकुलाबाबत निर्णय झाला नसून ते सुरू होण्याबाबत व्यापाऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, मुख्य बाजारपेठ परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली असून खरेदी-विक्रीसाठी ग्राहकांना पायीच बाजारपेठ परिसरात जावे लागणार आहे. हे करीत असताना मात्र या वाहनांच्या पार्किंगची जबाबदारी पालिकेवर सोपविण्यात आल्याने शहरात पार्किंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनचा सोमवार, १३ जुलै रोजी शेवटचा दिवस होता. आता लॉकडाऊन वाढविणार की संपणार या विषयी शहरवासीयांमध्ये उत्सुकता होती.
संध्याकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढत १४ पासून लॉकडाऊन हटविण्याचे जाहीर केले.
यामध्ये लॉकडाऊपूर्वी ६ जुलै रोजी जे व्यवहार सुरू होते ते व्यवहार सुरूच राहणार आहे. यात मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले बंदच राहतील. सोबतच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

व्यापारी संकूल बंदच राहणार
शहरातील व्यापारी संकूल सुरू होण्यासंदर्भात अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. राज्य सरकारनेच तशी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शहरातील व्यापारी संकूल सुरू करता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

बाजारपेठेत वाहनांनी प्रवेश करू नये साठी मनपाच्यावतीने उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये टॉवर चौक, भिलपुरा चौक, गांधी मार्केट परिसर, घाणेकर चौक, चित्रा चौक या परिसरात रस्त्यांवर पत्रे लावून प्रवेश बंद करण्यात आला.

दुकानांची वेळ दोन तास वाढविली
एकल दुकानांना पूर्वीप्रमाणे सम-विषम पद्धतीने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनदरम्यान, राज्य सरकारने दुकानांच्या वेळा दोन तासाने वाढविण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार आता या अनलॉकमध्ये त्याची अंमलबजावणी होणार असून आता सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

निवासी हॉटेल्स सुरू
या लॉकडाऊन दरम्यान राज्य सरकारने हॉटेलविषयी निर्णय जाहीर केला. त्यानुसार निवासस्थानाची व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये एकूण क्षमतेच्या ३३ टक्के वापर करीत हॉटेल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार ८ जुलैपासून राज्यात इतर भागात याची अंमलबजावणी झाली. मात्र जळगावात लॉकडाऊन असल्याने हॉटेल सुरू होऊ शकल्या नाही. आता मात्र १३ रोजी लॉकडाऊन संपल्याने १४ पासून हॉटेल सुरू करता येऊ शकतात.

रात्रीच हे परिसर केले सील
वाहनांच्या ये- जा वर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आल्याने शहरातील टॉवर चौकासह ११ रस्ते पत्रे लावून सील करण्यात आले आहे. बेंडाळे चौक, पंकज आॅटो, चित्रा चौक, कोर्ट चौक (३ व ४ च्या उत्तरेकडील सर्व गल्ली बोळ बंद), टॉवर चौक, घाणेकर चौक, भील पुरा चौक (६ व ७ च्या उत्तरेकडील सर्व गल्ली बोळ बंद), सुभाष चौक, नयनतारा शो रुम गल्ली, ६ ते ८ घाणेकर चौक ते सुभाष चौक पर्यंतच्या पूर्वेकडील सर्व रस्ते व गल्ली बंद

संकूल बंद, मालवाहतुकीच्या परवानगीने संभ्रम
अनलॉक संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट हे सुरू करण्यासंदर्भात आदेश नसले तरी या परिसरात खाजगी वाहनांना बंदी घालत माल वाहतूक करणारे मॅटेडोअर, अ‍ॅपेरिक्षा, हातगाड्या यांना परवानगी राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्व नागरिकांच्या सहकार्याने हा जनता लॉकडाऊन यशस्वी झाला. या पुढेही अशाच प्रकारे स्वयंशिस्तीचे पालन करावे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी न करता आपापल्या परिसरातच आवश्यक गोष्टींची खरेदी करावी. मास्कचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे. या पुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळा.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

मुख्य बाजारपेठेत वाहनांना बंदी, पार्किंगची करावी लागणार व्यवस्था
1 शहरातील फुले मार्केट, गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक परिसर, बळीराम पेठ, दाणा बाजार ही वर्दळीचे ठिकाण ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात खरेदीसाठी जाताना ग्राहकांना पायीच जावे लागणार आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाºया ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कोठे आहे, याची माहिती मनपाने नागरिकांना उपल्ध करून द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जनता कर्फ्यूचे दिवस करावे लागणार निश्चित
2 प्रभागांचे विभाजन करून प्रत्येक प्रभागात एक किंवा दोन दिवस जनता कर्फ्यू पाळावा लागणार असल्याने त्यासाठी प्रभागनिहाय दिवस ठरविण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
घाऊक मालाची खरेदी सकाळी १० वाजेपर्यंत
3 शहरातील धान्य व इतर मालाच्या व्यापाऱ्यांना येणारा माल तसेच घाऊक मालाची खरेदी सकाळी १० वाजेपर्यंतच पूर्ण करावी लागणार आहे. तसेच मालवाहतूक वाहनातून रात्री ८ ते सकाळी १० या वेळेत खाली करणे व सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत विक्रीचे व्यवहार करण्याचे निर्देश दिले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरोकळ विक्रेते तसेच नागरिकांना प्रवेश राहणार नाही. तेथे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृउबा सचिवांवर राहणार आहे.

असे राहणार निर्बंध
-ठरवून दिलेल्या ठिकाणीच भाजीपाला, फळ विक्री करता येणार
४१० वर्षाखालील बालके तसेच ६५ वर्षांवरील नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये
-घराबाहेर पडताना हातरुमाल अथवा इतर तत्सम साधनांचा वापर न करता मास्कचाच वापर करावा लागणार
-शासकीय कार्यालयात अंत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त (सुनावणी, समक्ष खुलासा सादर करणे) गर्दी करता येणा नाही
-अनावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर गावावरून येण्यास निर्बंध. केवळ शासकीय अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, लग्न समारंंभ, अंत्यविधीला येण्या-जाण्यासाठी मुभा राहणार
-सर्व प्रकारची मालवाहतूक मात्र सुरळीत राहणार

Web Title: Even in the new order, the 'lock' of merchant packages remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.