महाराष्ट्रातील या गावाला ब्रिटिशही घाबरायचे, असं होतं कारण
By अमित महाबळ | Published: August 15, 2022 02:04 AM2022-08-15T02:04:58+5:302022-08-15T02:07:38+5:30
ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता.
अमित महाबळ -
जळगाव: नांद्रा बु. गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची शौर्यभूमी. गाव छोटे होते, तरी कार्य मोठे राहिले. देशासाठी लढताना ब्रिटिशांच्या नाकात दम आणायचे काम या गावातून झाले. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग नोंदवला म्हणून तुरुंगवास भोगणारे ११ जण गावातील आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा येथे ‘स्वातंत्र्य सैनिक’ भवन बांधलेले आहे.
ब्रिटिश काळात नांद्रा बु. जेमतेम २०० ते २५० घरांचे होते. गाव छोटे असूनही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे अनेक जण होते. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकात दम आणला होता. १२ सप्टेंबर १९४२ या दिवशी पोळा सण होता. त्या दिवशी त्यांनी बैलांच्या शिंगावर झेंडे बांधून मिरवणूक काढण्यात पुढाकार घेतला. तसेच ब्रिटिश फौजदाराला दोरीने बांधून ठेवले होते. त्यांनी ब्रिटिशांना त्रासून सोडले होते. म्हणूनच जवळ कानळदा गाव असूनही नांद्रा गावातच पोलीस औट पोस्ट स्थापन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आव्हाणे गावापासून भोकर, पळसोदपर्यंतचा परिसर होता.
असा झाला आझाद चौक -
स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ नांद्रा गावात ‘स्वातंत्र्य सैनिक भवन’बांधलेले आहे. चळवळीची सुरुवात जेथून व्हायची त्या चौकास आझाद चौक असे म्हणतात. त्याचे उद्घाटन १९ सप्टेंबर २००९ रोजी झाले. हे भवन बनविण्यासाठी शामसुंदर नवाल यांनी पुढाकार घेतला, अशी माहिती नरेश नवाल यांनी दिली.
हे आहेत स्वातंत्र्य सैनिक
भाऊलाल आगीवाल, भगवानदास नवाल, बाबुलाल आगीवाल, कौतिक सोनवणे, भिकारी चौधरी, बाजीराव पाटील, शंकरलाल देपुरा, भाऊलाल देपुरा, शंकरलाल नवाल, शिवनारायण आगीवाल, लालचंद तिलकचंद समदाणी.