अधिकाऱ्यांविना ‘महसुली’ खुर्च्याही घामाघूम! जिल्हा पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह १० पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 04:11 PM2023-04-20T16:11:34+5:302023-04-20T16:14:07+5:30
गेल्या आठवड्यात राज्य शासनाने दीडशेवर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
- कुंदन पाटील
जळगाव : जळगावच्या ‘महसुल’ प्रशासनाला अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच धक्का दिला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह १० महत्वाच्या पदांवर नियुक्त्या रखडल्याने जनतेपाठोपाठ अधिकाऱ्यांच्या बंद दालनातील खूर्च्याही घामाघूम झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात राज्य शासनाने दीडशेवर तहसीलदार व उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. ‘तातडीने कार्यमुक्त करा’ या शासकीय आदेशानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी लगेचच जळगाव सोडले. मात्र त्यांच्या जागी नियुक्त्या झालेल्या अधिकाऱ्यांनी जळगाव येण्यास नापसंती दाखविल्याने महसुल प्रशासनाचीही कोंडी झाली आहे.
तसेच काही अधिकाऱ्यांना महसुलवगळता अन्यत्र नियुक्त्या दिल्यानंतरही त्यांनी जळगावला येण्याची तयारी दाखविलेली नाही. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून जळगावच्या महसुल प्रशासनातील महत्त्वाची पदे रिक्तच आहेत. परिमाणी ग्रामीण जनतेसह प्रशासकीय पातळीवरही कोंडी होत आहे. जिल्हाधिकारीही सुटीवर जिल्हाधिकारी अमन मित्तल आठ दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे आहे. मित्तल हे सोमवारी रुजू होणार आहेत. त्यानंतरही रिक्त पदांचा भार अन्यत्र सोपविला जाण्याची शक्यता आहे.
या ‘खूर्च्या’खाली....
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील नगरला बदलून गेले आहेत, त्यांच्या जागी अद्याप नियुक्ती नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या जागी धुळ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. सुर्यवंशी यांनी पदभार सोडला आहे. मात्र दहा दिवसानंतरही गायकवाड यांनी पदभार स्वीकारलेला नाही. भूसंपादन विभागातील राजेंद्र वाघ यांची नाशिकला तर किरण सावंत यांनीही आदेशानुसार पदभार सोडला आहे. मात्र सावंत यांच्या जागी नियुक्ती झालेल्या जयश्री माळी यांनी पदभार स्वीकारलेला नाही.तर वाघ यांच्या जागी अद्याप नियुक्तीचे आदेश निघालेले नाहीत. तापी महामंडळावर पहिल्यांदाच उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार अरुणा गायकवाड यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतरही त्या रुजू झालेल्या नाहीत. अमळनेर प्रांताधिकारी म्हणून चंद्रपूरहून येणारे खेडेकर यांनीही पदभार स्वीकारलेला नाही.
तहसीलदारांविना कामकाज
धरणगाव, बोदवड व अमळनेर येथील तहसीलदार पदही रिक्त आहे. तसेच निवडणूक शाखेतील हंसराज पाटील यांच्या जागीही अद्याप नियुक्ती झालेली नाही.त्यामुळे तहसीलदारांची जिल्ह्यात चार पदे रिक्तच आहेत.