जळगावात चोरट्यांनी संपूर्ण घर शोधूनही चार लाखांचा ऐवज सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:17 PM2019-09-04T13:17:55+5:302019-09-04T13:19:05+5:30
एकाच रात्री तीन घरफोड्या
जळगाव : चोरट्यांनी शिक्षकवाडीतील सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक जनार्दन चौधरी यांचे बंद घर फोडले. घरातील सर्व कपाट फोडले, त्यातील साहित्य घरात फेकले..डब्बे, बेड याचीही तपासणी केली, मात्र तरीही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चौधरी यांनी हुशारीने ठेवलेले ६५ हजार रुपये रोख व सोने चांदीचे दागिने असा चार लाखाचा ऐवज सुरक्षित राहिला आहे.
रिंगरोड परिसरातील शिक्षकवाडीत मु. जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अशोक जर्नादन चौधरी हे पत्नी वसुधा वास्तव्यास आहेत. त्याचे पियुष व अंकुश हे दोन्ही मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. एक डॉक्टर तर दुसरा अभियंता आहे. ३० आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर चौधरी दाम्पत्य हे पुणे येथील मुलांकडे गेले आहेत. शेजारील रहिवाशांना मंगळवारी त्यांच्या मागच्या दरवाजा तुटलेला दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघड आला. शेजारच्यांनी तत्काळ चौधरी यांना फोनवरुन घटना कळविली. चौधरी यांनी त्यांचे जळगावातील व्याही प्रमोद पाटील व नातेवाईक राजेंद्र खडके यांना प्रकार कळवून घरी पाठविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
आनंद कॉलनीतील बंद घरे फोडली
तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत दादावाडी परिसरात आनंद कॉलनीत सुभद्राबाई मधुकर चौधरी व त्यांचे शेजारी भगवान आनंदा हरणे यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडले. सुभद्राबाई यांच्या घरातून चोरट्यांनी पाच हजाराची रक्कम लांबविली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी सुभद्राबाई गणेश कॉलनीत मोठ्या मुलीकडे गेल्या होत्या. हरणे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील किती ऐवज चोरी झाला ते कळू शकले नाही.
जेवणावर ताव मारुन चोरटे खाली हात परतले
चौधरी यांचे व्याही प्रमोद पाटील व राजेंद्र खडके आल्यावर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी फ्रीज, देव्हारे, बेड, तसेच कपाटे अशा सर्व वस्तूंमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. त्याची माहिती खडके यांनी चौधरी यांना दिली. दाम्पत्याने जाण्यापूर्वी त्यांचे दागिने व ६५ हजाराची रोकड असलेली पेटी कपाटाच्या खाली एका कोपऱ्यात ठेवली होती. त्याबाबत खात्री करायला सांगितले असता ती पेटी सुरक्षित होती. ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यात शंभर, ५० व १० रुपयांच्या नव्या कोºया नोटांचे बंडल होते. हा ऐवज सुरक्षित असल्याने खडके यांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेत चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र जातांना त्यांनी जेवणावर ताव मारला आहे.